लोणावळ्यात मुसळधार; शहरात सर्वत्र पाणीच पाणी

लोणावळा  – लोणावळा शहरात सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत सातत्याने मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. अनेक रस्ते पाण्याखाली गेले, तर काही सखल भागातील रहिवासी परिसरात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

मागील दोन आठवड्यापासून मॉन्सूनने लोणावळा शहर आणि परिसराला चांगलेच झोडपून काढले आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच तळाला गेलेल्या येथील धरणांमधील पाणी पातळी कमालीची वाढली आहे. पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेले भुशी धरण आठवडा भरापूर्वीच “ओव्हर फ्लो’ झाले आहे, त्याचबरोबर तुंगार्ली, लोणावळा, वलवण धरणातील पाणी पातळी समाधानकारक रित्या वाढत आहे.

लोणावळा शहरात रविवारी सकाळी सात वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत 24 तासांत 102 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर यंदाचा एकूण पाऊस 1304 मिलिमीटर इतका नोंदविण्यात आला आहे. सोमवारी देखील पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे भुशी धरणाच्या सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्यालाही प्रचंड वेग होता. आणि त्यामुळे येथे पर्यटनाला आलेल्या पर्यटकांना धरणाच्या पायऱ्यांवर बसून या वाहत्या पाण्याचा आनंद लुटता आला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.