#लोकसभा2019 : विदेशातून येवूनही मतदानापासून वंचित

रसिका जोशी यांची खंत : मतदार यादीत नाव नसल्याचा दावा

निगडी – मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अरब मधून येवूनही मतदान न करता आल्याची तक्रार निगडी येथील रसिका दीपक जोशी यांनी केली आहे. मतदार ओळखपत्र तसेच आधारकार्डसह अन्य कागदपत्र असतानाही मतदार यादीत नाव नसल्याचे कारण देत आपल्याला मतदान करण्यापासून रोखण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

रसिका यांचे पती दीपक जोशी हे अरब देशातील बहरीन येथे नोकरीनिमित्त मागील 30 वर्षांपासून राहत आहेत. मतदानासाठी रसिका या भारतात आल्या. सकाळी साडेनऊच्या सुमारास निगडीतील यमुनानगर येथील शिवभूमी विद्यालयात त्या नेहमीप्रमाणे मतदानासाठी गेल्या. मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, वाहन परवाना ही कागदपत्रे त्यांच्याकडे होती. मात्र, मतदार यादीत त्यांचे नाव नसल्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही. त्यांनी याबाबत मतदान केंद्र प्रमुखांकडे तक्रार केली आहे.

अधिक माहिती देताना रसिका जोशी म्हणाल्या की, 1990 पासून आम्ही मतदानासाठी भारतात येतो. प्रत्येक लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतो. नियमितपणे मी मतदानासाठी आले. परंतु, मतदान करता येणार नाही, हे कारण समजल्यानंतर धक्काच बसला. माझा पैसा आणि वेळ वायाला गेला. त्याही पेक्षा जास्त मला मतदान करता आले नाही याचे दुःख आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मतदान यंत्रणा अधिकाधिक सुलभ केली जात असल्याचा दावा केला जातो. मतदार यादीतील दुरुस्ती अथवा अन्य कामासाठी आम्हाला त्या-त्या वेळी विदेशातून येणे शक्‍य नसते. अशा मतदारांसाठी ऑनलाईन सुविधा द्यायला हव्यात. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.