पुण्याची जागा कॉंग्रेससाठीच

काकडेंच्या मनसुब्यांवर अजित पवारांकडून पाणी

पुणे – लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून काहीही करून उमेदवारी मिळावी, यासाठी राज्यसभेचे खासदार संजय काकडेंची घालमेल सुरू असल्याने त्यांनी सोमवारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेत चर्चा केली. मोठ्या भावाने लाथाडले, तर दुसऱ्या पर्यायाची घोषणा त्यांनी त्यापूर्वीच केली होती. शहर कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी लोकसभेसाठी आयात उमेदवार नको, म्हणून काकडे यांची दारे आधीच बंद केली असल्याने काकडेंना राष्ट्रवादी हाच पर्याय उरला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, पुण्याची जागा कॉंग्रेसला सोडणार अशी रात्री उशिरा अजित पवार यांनी घोषणा केल्यामुळे काकडे यांच्या लोकसभेसाठीच्या मनसुब्यांवर चांगलेच पाणी पडले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भाजपचे सहयोगी खासदार काकडे यांनी “महापालिकेत भाजपचे 98 नगरसेवक निवडून येतील,’ अशी भविष्यवाणी केली होती. त्यानंतर काकडे चांगलेच चर्चेत आले होते. त्यानंतर काकडे आणि बापट यांच्या महापालिकेतील नगरसेवकांच्या कुरघोडीवरून वाद सुरू होते. सहा महिन्यांपूर्वी काकडे यांनी काही महिन्यांपूर्वी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर थेट टीका केली. त्यानंतर भाजपकडून काकडे यांना जवळपास वाळीतच टाकण्यात आले होते. त्यातच काकडे यांच्याकडून वारंवार भाजपचा लोकसभेचा उमेदवार आपण असल्याचे सांगत, 70 टक्के पुणेकरांचा आपल्याला कौल असल्याचे भाकीत केले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत भाजप आणि काकडेंचा वाद विकोपाला गेल्याने भाजपचे लोकसभेचे तिकीट आपल्यासाठी दिवास्वप्न ठरणार असल्याचे दिसताच, काकडे यांनी मागील महिन्यात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे काकडे पुण्यातून कॉंग्रेससाठी इच्छूक असल्याचे बोलले जात होते. मात्र, शहर कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी लोकसभेसाठी आयात उमेदवार नको म्हणून ठरावच केला. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये आपली डाळ शिजणार नाही, हे लक्षात येताच, काकडे यांनी राष्ट्रवादीकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यातूनच त्यांनी सोमवारी अजित पवार यांची भेट घेतली असल्याची चर्चा आहे. मात्र, या भेटीनंतर “भाजपने माझा वापर केला असून मुख्यमंत्र्यांना मी भावासारखा मानतो, पण त्यांनीच लाथ मारली आहे. त्यामुळे दुसरं घर शोधत आहे,’ अशी प्रतिक्रिया देत आता थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधला आहे.

…अपक्ष लढणार?
राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि भाजप या तीनही पक्षांकडून लोकसभेसाठी काकडे यांना संधी मिळण्याची शक्‍यता जवळपास नसल्याचे वर्तवले जात आहे. अशा परिस्थितीत भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील, अशी शक्‍यता राजकीय वर्तुळातून व्यक्‍त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)