बीसीसीआयसाठी लोकपालची नियुक्‍ती

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात “बीसीसीआय’साठी लोकपालची नियुक्‍ती केली. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश डी.के. जैन यांची सर्वोच्च न्यायालयाच्यावतीने “बीसीसीआय’चे लोकपाल म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस.ए. बोबडे आणि न्या. ए.एम.सप्रे यांच्या पिठाने ही नियुक्‍ती केली. सर्व संबंधितांच्या मान्यतेने आणि सुचनांनुसार न्या. डी.के.जैन यांची “बीसीसीआय’चे प्रथम लोकपाल म्हणून नियुक्‍ती करण्यात येत आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

लोकपाल म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या सहा माजी न्यायाधीशांच्या नावांचे प्रस्ताव होते. “ऍमिकस क्‍युरी’ पी.एस.नरसिंहा यांनी हे प्रस्ताव न्यायालयासमोर ठेवले होते. त्यापैकी न्या. डी.के.जैन यांच्या नावाला सर्व संबंधितांकडून सर्वाधिक पसंती मिळाल्याने त्यांची नियुक्‍ती करण्यात आली.

क्रिकेट खेळाडू आणि राज्यांच्या क्रिकेट संघटनांमधील आर्थिक वादांवर तोडगा शोधणे हे या लोकपालचे काम असणार आहे. लोकपालची नियुक्‍ती झाली असती तर अगदी अलिकडे हार्दिक पांड्या आणि के.एल.राहुल या खेळाडूंसंदर्भातील वाद लवकर सोडवता येऊ शकला असता, असे नरसिंहा यांनी न्यायालयाला सांगितले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 9 ऑगस्ट 2018 रोजीच्या निकालामध्ये “बीसीसीआय’साठी लोकपालची नियुक्‍ती करण्याची शिफारस केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.