अभिवादन : असंतोषाचे जनक आणि राष्ट्रनायक

– हेमंत देसाई

इंग्रजांचे कृपाछत्र मिळवलेल्या मंडळींना “राजमान्य’ म्हणून संबोधले जाई. पण जनतेने उत्स्फूर्तपणे टिळकांना “लोकमान्य’ ही बहुमानाची पदवी अर्पण केली. एक ऑगस्ट रोजी टिळकांचे देहावसान होऊन शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने टिळकांची महानता सांगावीशी वाटते…

महात्मा गांधींचे एक अनुयायी आणि कॉंग्रेसचे चरित्रकार डॉ. पट्टाभी सीतारामय्या यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि नामदार गोपाळकृष्ण गोखले या दोघांबद्दल फार चांगली निरीक्षणे नोंदवली आहेत. ते म्हणतात, दोघेही पहिल्या प्रतीचे देशभक्‍त. गोखल्यांना देशातली राज्यपद्धती सुधारायची होती, तर टिळकांना ती नव्याने घडवायची होती. गोखल्यांना नोकरशाहीच्या सहकार्याने काम करायचे होते, तर टिळकांना तिच्याशी संघर्ष करायचा होता.

परकीयांची मने जिंकून घेण्याची आस गोखल्यांना होती, तर टिळकांना परकीयांचे उच्चाटन करायचे होते. गोखल्यांचे विचार व्यक्‍त झाले ते इंग्रजीतून, तर टिळकांचे मातृभाषेतून. स्वयंशासन हे गोखल्यांचे उद्दिष्ट व त्यासाठी ब्रिटिशांनी ठरलेल्या कसोट्या भारतीयांनी पार कराव्यात, असे त्यांचे मत. तर टिळकांच्या मते, स्वराज्य हा प्रत्येक भारतीयाचा जन्मसिद्ध हक्‍क आणि त्यात परकीयांनी हस्तक्षेप करण्याचे कारण नाही. 1907 साली कॉंग्रेसच्या सुरत अधिवेशनात जहाल आणि मवाळ यांच्यात संघर्ष झाला; परंतु या संघर्षाला तात्त्विक अधिष्ठान होते.

टिळकांनी कॉंग्रेसचा प्रभाव देशभर निर्माण व्हावा, यासाठी अतोनात कष्ट घेतले. टिळकांप्रमाणे काही प्रमाणात एक यशवंतराव सोडले, तर राष्ट्रीय पातळीवर एकाही मराठी नेत्याने कॉंग्रेसमध्ये प्रभाव गाजवला नाही. टिळकांपासून किमान आजच्या कॉंग्रेस नेत्यांनी काही शिकण्यासारखे आहे. ते शिकतील की नाही, हा भाग वेगळा. आज करोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध आले आहेत, त्यामुळे यावेळी सुदैवाने गोंगाट व प्रदूषण कमी होणार आहे. मात्र टिळकांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सव सुरू केला, त्या हेतूस संपूर्णपणे हरताळ फासण्याचे काम गेल्या 40-50 वर्षांत झाले आहे. निदान याबाबतीत तरी गणेशोत्सव मंडळांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे.

मृत्यूपूर्वी काही दिवस अगोदर टिळक बोरीबंदर येथील सरदारगृहात राहात होते. त्यांच्या अंत्यविधीस हजर राहण्यासाठी लोकांना येता यावे म्हणून स्पेशल ट्रेन सोडण्यात आली. गिरगावातील सोनापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करणे गर्दीमुळे अशक्‍य वाटल्यामुळे, मुंबईच्या गव्हर्नरांची परवानगी घेऊन गिरगाव चौपाटीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेस लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. गांधीजींनी स्वतः लोकमान्य टिळकांना खांदा दिला आणि पंडित नेहरू, शौकत अली, बॅरिस्टर जीना यांसारखे बडे नेते अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. टिळकांनी पहिल्या प्रथम स्वराज्याचे उद्दिष्ट भारतीयांसमोर ठेवले. स्वराज्याचा त्यांचा मंत्र व स्वदेशीची कल्पना वेगाने लोकप्रिय झाली.

जनजागृतीसाठी टिळकांनी अखंड प्रयत्न केले. चळवळी उभारल्या. 1908 साली त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला आणि मंडालेच्या तुरुंगात त्यांना ठेवण्यात आले. स्वातंत्र्य चळवळीत टिळकांनी केलेल्या अपूर्व त्यागामुळे व त्यांच्या असामान्य जिद्दीमुळे ते लोकप्रिय झाले. साम्राज्यनिष्ठा, सम्राटाविषयी भक्‍तिभाव, अर्जविनंत्या, राज्यकर्त्यांचे मतपरिवर्तन इत्यादी कल्पना टिळकांसारख्या जहाल पुढाऱ्यांना निरर्थक वाटत. इंग्रजांनी देऊ केलेल्या घटनात्मक सुधारणांचा उपयोग भारतीयांनी अवश्‍य करावा, पण स्वराज्यप्राप्तीकडे दुर्लक्ष करू नये, असे त्यांचे म्हणणे होते.

टिळकांप्रमाणेच बिपिनचंद्र पाल व लाला लजपतराय हेदेखील जहाल पुढारी. टिळकांना तीनदा कारावास पत्करावा लागला. 1896 साली गांधीजींनी पुण्याला भेट दिली. “दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांचे प्रश्‍न’ या विषयावर एक सभा घेण्याचा त्यांचा इरादा होता. तेव्हा ते टिळकांना भेटले आणि त्यांच्या सल्ल्यानुसार, गोखल्यांनाही भेटले. “टिळक मला हिमालयासारखे भासले, तर गोखले गंगेसारखे’ असे गांधीजी म्हणाले होते.

1907 साली कॉंग्रेसचे तेविसावे अधिवेशन खरेतर सुरतला भरायचे नव्हते. ते नागपूरला भरवायचे, असा ठराव कलकत्त्याच्या बाविसाव्या अधिवेशनातच मंजूर झाला होता. पण कॉंग्रेस कमिटीने स्थानिक मतभेदांचे कारण दाखवून अधिवेशनाची जागा बदलायचा निर्णय घेतला. अधिवेशन नागपूरला झाले असते, तर जहालांचा वरचष्मा व्हायची शक्‍यता होती. कारण नागपूर किंवा अवघा वऱ्हाड हा टिळकवाद्यांचा गड होता. कॉंग्रेस कमिटीत जुन्या नेमस्त पुढाऱ्यांचे बहुमत होते.

सुरत हा फिरोजशाह मेहता आणि पर्यायाने नेमस्तांचा बालेकिल्ला. तेथे अधिवेशन भरवून आणि आपले बहुमत साधून, नेमस्तांना टिळकवाद्यांचे कडवे धोरण फेटाळायचे होते आणि कॉंग्रेसची नवी घटनाही मान्य करून घ्यायची होती. अनेकांना टिळकांनीच अध्यक्ष व्हावे, असे वाटत होते. पण स्वागत समितीने बंगालचे मवाळपंथी पुढारी डॉ. रासबिहारी घोष यांची निवड अध्यक्षपदी केली. तडजोडीचा प्रस्ताव म्हणून जहालांनी लाला लजपतरायांचे नाव पुढे केले. पण त्यांनी स्वतःच अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे डॉ. घोष यांची निवड होणार, हे स्पष्ट झाले.

टिळकवादी अरविंदबाबू घोष यांनी आपल्या अनुयायांची वेगळी बैठक बोलावली. मध्यस्थीचे प्रयत्न चालू होते. स्वराज्याच्या चतुःसूत्रीचे ठराव पुन्हा मांडून मंजूर करायचे का नाही, हा वादाचा मुख्य मुद्दा होता. विषयपत्रिकेत नेमस्तांनी हे ठराव अगदीच मिळमिळीत भाषेत लिहिले आहेत, असे जहालांचे मत होते. खुल्या अधिवेशनाला सुरुवात होऊन, अध्यक्षपदासाठी स्वागताध्यक्षांनी डॉ. रासबिहारी घोष यांचे नाव सुचवले. सभागृहातून समर्थनपर आणि विरोधी अशा घोषणांचा गलका सुरू झाला.

अधिवेशन तहकूब होऊन दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरू झाले. रासबिहारी हे मिरवणुकीने व्यासपीठावर येत असतानाच टिळकांनी एक चिठ्ठी स्वागताध्यक्षांकडे सरकवली. “अध्यक्षांच्या निवडीबद्दल मला बोलायचे आहे. तहकुबीची सूचना मी करीन आणि एक विधायक प्रस्तावही ठेवेन. अनुमोदनाचे भाषण संपल्यावर कृपया माझे नावजाहीर करावे’, असे त्या चिठ्ठीत लिहिले होते. पण सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी अनुमोदन देणारे भाषण संपवले, तरी टिळकांच्या चिठ्ठीकडे दुर्लक्ष करण्यात आले.

टिळक आपला भाषणाचा हक्‍क बजावण्यासाठी व्यासपीठाकडे निघाले. तोपर्यंत डॉ. घोष बिनविरोध निवडून आल्याचे जाहीरही करण्यात आले. टिळकांनी व्यासपीठावर जाऊन भाषण करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना परवानगी नाकारण्यात आली. तेवढ्यात खुर्च्यांची फेकाफेक सुरू झाली. आक्रमक झालेल्या मवाळांच्या कब्जात कॉंग्रेस गेली. पण जहाल-मवाळ वादात नुकसान कॉंग्रेसचे झाले आणि फायदा ब्रिटिशांचा झाला. मात्र त्यापूर्वीही 1895 सालचे पुण्यातील कॉंग्रेस अधिवेशन टिळकांनी जवळजवळ उधळून लावले होते. कारण त्या अधिवेशनात कॉंग्रेसच्या मंडपात सामाजिक परिषद भरवण्याची योजना टिळकवाद्यांनी हाणून पाडली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.