एमपी मिल कंपाऊंड घोटाळा
विरोधी पक्षांनी केली राजीनाम्याची मागणी
मुंबई (प्रतिनिधी) – मुंबईतील ताडदेवच्या वादग्रस्त एमपी मिल कंपाऊंड झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या गैरव्यवहार प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर लोकायुक्त एम. एल. तहलीयानी यांनी चौकशी अहवालात ताशेरे ओढल्याचे समजते. या अहवालामुळे मेहता यांचे मंत्रीपद धोक्यात आले असून विरोधीपक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
एमपी मिल कंपाऊंड झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाला नियमबाह्यपणे मंजुरी देत यामध्ये 500 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला आहे. एसआरएला परवानगी देताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचे नमूद करीत फाईलवर विकासकाच्यादृष्टीने अनुकूल शेरा लिहिल्याचा मेहतांवर आरोप आहे. या घोटाळ्यासंदर्भात विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधी पक्षांनी हा मुद्दा लावून धरत चौकशीची मागणी केली होती. त्यासाठी विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ करीत कामकाज बंदही पाडले होते. अखेर मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी लोकायुक्तांमार्फत चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली होती.
लोकायुक्त तहलीयानी यांनी चौकशी करून आपला अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाला सादर केला आहे. अहवाल अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला नाही. तथापि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशीत मेहतांवर दोषारोप ठेवण्यात आला आहे. मेहता यांनी मंत्री म्हणून आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली नाही, असे अहवालात नमूद करण्यात आल्याचे समजते.
मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा!
लोकायुक्तांच्या ताशेऱ्यानंतर विरोधी पक्षाने गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. आम्ही मेहता यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर लोकायुक्तांनी शिक्कामोर्तब केले आहे. अहवालामुळे मंत्र्यांना सतत क्लिनचीट देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे पितळ उघडे पडले आहे. त्यामुळे आता मेहतांचा ताबोडतोब राजीनामा घ्यावा, अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. मेहता दोषी आढळल्यानंतरही मुख्यमंत्री भ्रष्टाचारी मंत्र्यांची पाठराखण करायचे सोडून मेहतांचा राजीनामा घेणार काय? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. तर मेहतांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.