लोकसभा निवडणुकीच्या रिंगणाबाहेर

तब्बल 52 वर्षांनंतर शेकापचा एकही उमेदवार नाही
शेकापचा लालबावटा पहिल्यांदाच

अमरसिंह भातलवंडे

शेकापला गतवैभव मिळणार का?

एकेकाळी महाराष्ट्रामध्ये बलाढ्य असलेल्या कॉंग्रेससमोर शेतकरी कामगार पक्ष समर्थ पर्याय बनून उभा राहिला होता. मात्र, 1965 नंतर शेतकरी कामगार पक्षातील बड्या नेत्यांना तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांनी कॉंग्रेसच्या गोटात दाखल करून घेतले. मग हळूहळू पक्षाचा प्रभाव कमी होत गेला. नंतरच्या काळात काही जिल्ह्यांपुरताच सीमित राहिला. आता सोलापुरातील सांगोल्यासह रायगड जिल्ह्यात या पक्षाचे अस्तित्व टिकून आहे. इतर जिल्ह्यांत पक्षाची पकड कमी होत आहे. या निवडणुकीत शेकापचे प्राबल्य असलेल्या मावळ लोकसभेची जागाही शेकापच्या हातून निसटून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आली आहे. त्याबदल्यात विधानसभेला अधिक जागा लढणार असल्याचे सांगितले जात आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीने शेकाप गतवैभव प्राप्त करण्याचे प्रयत्न करत आहे. परंतु कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे पक्ष शेकापला ते गतवैभव मिळवून देतील का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

पिंपरी – स्थापनेनंत तब्बल 52 वर्षांच्या काळात ज्या पक्षाने राज्यात आपला दबदबा निर्माण केला त्या शेतकरी कामगार पक्षाचा पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार उभा राहिलेला नाही. काही ठराविक भागात आजही चांगले अस्तित्व असलेल्या शेकापने लोकसभेसाठी कॉंग्रेस राष्ट्रवादीला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. जागावाटपात एकही जागा वाट्याला न आल्याने या पक्षाने उमेदवार उभा केला नसला तरी लोकसभेसाठी उमेदवारच नसल्याने या पक्षाच्या अस्तित्त्वावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

विधानसभेच्या मैदानात सन्मानाने सोबत मिळणार असल्याचे आश्‍वासन महाआघाडीत मिळाले असले तरी या पक्षाला विधानसभेच्या किती जागा वाट्याला येतात यावर आता राज्यातील या पक्षाचे अस्तित्त्व सिद्ध होणार आहे.
संयुक्‍त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर शेतकरी कामगार पक्षाचा लालबावटा कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह महाराष्ट्रभर पसरला होता. शेकापच्या दुसऱ्या फळीने विधानसभेसह लोकसभेतही आपला दबदबा निर्माण केला. मात्र, 70 च्या दशकानंतर शेकापला लागलेली ओहटी आजही कायम असून पक्षाचे अस्तित्व आता काही ठराविक जिल्ह्यांपुरतेच मर्यादित राहिले आहे. सध्याच्या घडीला शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍न गंभीर झालेला असताना संघर्षाचा इतिहास असलेला शेकापचा लालबावटा मात्र निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर फेकला गेला आहे. यावेळी 52 वर्षांच्या ऐतिहासिक परंपरेला छेद देत हा पक्ष लोकसभा निवडणुकीच्या बाहेर राहिला असून इतरांवर समर्थन देण्याची पाळी या पक्षावर आली आहे.

तत्कालीन सरकारच्या विरोधात शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे राज्य स्थापन करण्यासाठी पुण्यामध्ये 3 ऑगष्ट 1947 रोजी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना करण्यात झाली होती. शेकापची स्थापना झाल्यानंतर पक्षाची धोरणे सर्वसामान्य लोकांना समजावी म्हणून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात अभ्यासवर्ग व शिबिरे घेण्यात आली. पुढे जाऊन या पक्षाने शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्‍न घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात रान पेटवून तत्कालीन राज्यकर्त्यांना घाम फोडला होता. 1948 ते 1956 हा शेकापचा सुवर्णकाळ समजला जात होता.

1952 च्या निवडणुकीत शेकापचे 28 आमदार निवडून आले होते. तर लोकसभेमध्ये शंकरराव मोरे, भाई उध्दवराव पाटील यांच्यासारख्या नेत्यांनी प्रतिनिधित्व केले होते. 1948 ते 2014 या काळाचा विचार करता शेकापकडे यशवंतराव मोहिते, एन.डी पाटील, भाई उद्धवराव पाटील, अण्णासाहेब गव्हाणे, दाजीबा देसाई, कुष्णराव धुळव, विठ्ठलराव हांडे यांच्यासह मराठवाड्यातील अण्णासाहेब गव्हाणे, किशनराव देशमुख, केशवराव धोंडगे या सर्व नेत्यांनी महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्षाचा वेगळा दबदबा निर्माण केला होता. पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगोल्यामध्ये एकवेळचा अपवाद वगळता 1962 पासून गणपतराव देशमुख हे या मतदारसंघाचे शेकापकडून विधानसभेत नेतृत्त्व करीत आहेत. अलिबाग, उरण, पेण या भागातही आजही शेकापचे वर्चस्व आहे.

पनवेल-उरण मतदान संघात 1972 व 2004 सालचा अपवाद वगळता आजही शेकापचे आमदार आहेत. उरण मध्येही मागच्या निवडणुकीत 900 मतांनी शेकापला पराभव स्वीकारावा लागला. आज घडीला शेकापचे विधानसभा व विधानपरिषद मिळवून 5 आमदार आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शेकाप आणि शिवसेनेमध्येच लढत झाली होती. लक्ष्मण जगताप यांनी शेकापकडून निवडणूक लढवली होती. पराभप झाला असला तरी, त्यांना 3 लाख 54 हजार 829 मते मिळाली होती. विशेष म्हणजे तेव्हा राष्ट्रवादीचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला होता. शेकापने हक्काची मावळची जागाही राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडली. एकेकाळचा हा बलाढ्य पक्ष मित्र पक्षांमुळे रिंगणबाहेरच राहिला आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापना झाल्यापासून मागील 52 वर्षांत पक्षाने सातत्याने लोकसभा निवडणूक लढवली आहे. या लोकसभा निवडणुकीत शेतकरी व कामगार वर्गाच्या हितासाठी, शेतकरी विरोधी भाजप सरकार सत्तेतून घालवण्यासाठी पक्षाने राज्यात कॉंग्रस-राष्ट्रवादी अघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एक पाऊल मागे येत या लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे केलेले नाहीत.

नितीन बनसोडे, शहराध्यक्ष, शेतकरी कामगार पक्ष, पिंपरी-चिंचवड

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.