Lok Sabha Elections 2024 । Sharad Pawar | Narendra Modi : सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून रविवारी शपथ घेतली. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन त्यांनी देशात नवीन इतिहास निर्माण केला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत 72 मंत्र्यांनीही शपथ घेतली. यामध्ये 30 कॅबिनेट मंत्री, 5 स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. अशा प्रकारे एनडीएच्या 9 पक्षांच्या 11 खासदारांना मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.
भारतीय जनता पक्षाने (भाजप) सर्व मित्रपक्षांना खूश करण्याचा प्रयत्न केला असला तरी, तरीही काही पक्षांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. कारण एनडीएच्या 14 मित्रपक्षांकडे 53 जागा आहेत, परंतु सध्या 9 पक्षांचे केवळ 11 नेते मंत्री झाले आहेत, तर 5 पक्षांच्या नेत्यांना मोदी 3.0 मध्ये स्थान मिळालेले नाही. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर 73 वर्षीय नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे दुसरे नेते ठरले आहेत.
यंदा लोकसभा निवडणुकीचा निकाल हा भाजपला धक्का देणारा ठरला असून, दुसरीकडे इंडिया आघाडीने उसंडी मारल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं आहे. दरम्यान, याच निकालावर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. यावेळी ते समाज माध्यमांशी बोलत होते.
माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, “यंदा 300 चा आकडा 240 वर आला. 60 जागा कमी झाल्या. उत्तर प्रदेशमध्ये लोकांनी वेगळा कौल दिला. मला असं वाटत होतं की, देशात राम मंदिर झाल्यानंतर निवडणुकीचा प्रचार त्यानुसार होईल आणि उत्तर प्रदेशचे जनता मतदान करेल.
मंदिराच्या नावावर मतदान मागितलं. म्हणून लोकांनी वेगळा निकाल दिला. मंदिर अयोध्येत बांधलं पण तिथंच भाजपचा उमेदवार पडला. देशाची लोकशाही माणसांच्या शहाणपणामुळे टिकली आहे’, असं शरद पवार म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणूक आता झाली आहे, आणि आता ही निवडणूक झाल्यानंतर राज्यातील जनतेचे आभार मानले पाहिजे. त्यांनी वेगळा निकाल दिला. देशात देखील वेगळा निकाल आला. गेली 10 वर्ष सत्ता मोदी साहेबांकडे आहे आणि त्याचा परिणाम या निकालात दिसला.
वेगळा निकाल लागला. सरकार बनलं, मंत्रिमंडळ स्थापन झालं आता अशी अपेक्षा करू की देशात आता स्थिरता येईल, त्याची देशाला गरज आहे. निवडणूक येयील आणि जातील देश आर्थिक मजबूत झाला आहे.’ असं देखील यावेळी शरद पवार म्हणाले.