‘या’ कारणामुळे लोकसभा निवडणूक निकालास विलंब होणार !

2 मतदारसंघात 168 टेबल, 288 फेऱ्या व 1808 कर्मचाऱ्यांची नियुक्ती; मतदानयंत्रे ठेवलेली गोदामे पूर्ण वातानुकूलित

मुंबई: संपूर्ण लोकसभा मतदारसंघाची एक फेरी पूर्ण झाल्यानंतरच पुढील फेरी सुरू होणार आहे. शिवाय एका विधानसभा मतदारसंघातील एक याप्रमाणे पाच व्हीव्हीपॅटमधील मतपत्रिका मोजण्यात येणार आहेत. एकावेळी एकाच व्हीव्हीपॅटमधील मतपत्रिकांची मोजणी होईल. ती मोजणी केल्यानंतरच अंतिम निकाल जाहीर होईल. काही कारणावरून विलंब झाल्यास वा हरकत असल्यास ते मतदानयंत्र निवडणूक अधिकारी यांच्या ताब्यात देण्यात येईल. त्याचा निर्णय मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर घेण्यात येणार आहे.

सोलापूर (राखीव) व माढा लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या मतदानाची मोजणी 23 मे रोजी होणार आहे. सकाळी आठला ती रामवाडी येथील गोदामात सुरू होईल. त्याची सर्व तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. ‘सोलापूर’चा निकाल येण्यास 13 तास तर ‘माढा’चा येण्यास 16 तासांचा कालावधी लागणार आहे. सकाळी आठला मतमोजणी सुरू होईल. अंतिम निकालासाठी पहाट उजण्याची शक्‍यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

एका विधानसभा मतदारसंघात 14 टेबल याप्रमाणे 168 टेबलवर मोजणी करण्यात येणार असून 288 फेऱ्या होतील. एक फेरी पूर्ण होण्यासाठी किमान 30 मिनिटांचा कालावधी लागणार आहेत. यासाठी 1 हजार 808 कर्मचारी नियुक्त केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली.

सोलापूरसाठी एकूण 140 फेऱ्या तर ‘माढा’च्या मतमोजणीच्या 144 फेऱ्या होतील. ‘सोलापूर’च्या अक्कलकोटमध्ये सर्वाधिक 26 तर ‘माढा’च्या सर्वाधिक 27 फेऱ्या होतील. इतर ठिकाणी 24 ते 26 फेऱ्या होतील. सर्वात कमी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील 20 फेऱ्या होतील. मतमोजणीच्या ठिकाणी मोबाइल वापरण्यास मनाई आहे. उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी मतदानयंत्रे ठेवलेली गोदामे पूर्ण वातानुकूलित करण्यात आली आहेत. मतमोजणी प्रक्रियेच्या चित्रीकरणासाठी 80 कॅमेरामनची व्यवस्था केली आहे.

आयोगाने प्रथमच मतमोजणीसाठीही स्वतंत्र निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. यामध्ये दोन विधानसभा मतदारसंघासाठी एक निरीक्षक नियुक्त असणार आहेत. ‘सोलापूर’साठी तीन तर ‘माढा’साठी तीन निरीक्षक असतील.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.