#लोकसभा2019 : अनेक उमेदवारांवर गुन्ह्यांची नोंद

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यासाठी सध्या देशभरातून 943 उमेदवार रिंगणात उतरले आहेत, त्यापैकी 306 उमेदवारांची मालमत्ता 1 कोटी रुपयांहून अधिक आहे. आतापर्यंत पार पडलेल्या तीन टप्प्यांच्या तुलनेत ही संख्या सर्वात कमी आहे. 158 उमेदवारांवर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, तर 21 उमेदवारांवर महिलांविरोधातील गुन्ह्यांची नोंद आहे.

गंभीर गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांमध्ये भाजपचे 20, कॉंग्रेसचे 9, बसपचे 10 आणि 45 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. किरकोळ गुन्हे दाखल असलेल्यांची संख्या 210 आहे. 4 उमेदवारांवर अपहरण, 5 जणांवर खून आणि 24 जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. भडकावू भाषणांशी संबंधित गुन्हे दाखल असलेल्यांची संख्या 16 आहे. एखाद्या मतदारसंघात 3 किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवारांवर गुन्हे दाखल असल्यास तेथे रेड अलर्ट जाहीर केला जातो. यानुसार 71 पैकी 37 मतदारसंघांत रेड अलर्ट जाहीर झाला आहे.

प्रत्येक उमेदवाराची सरासरी मालमत्ता 4.53 कोटी रुपये इतकी आहे. त्यातही कॉंग्रेसच्या 54 उमेदवारांची मालमत्ता सरासरी 29 कोटींहून अधिक आहे. कॉंग्रेसचे 50, भाजपचे 50, बसपचे 20 उमेदवार कोट्यधीशांच्या यादीत समाविष्ट आहेत.

मध्य प्रदेशच्या चिंदवारा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार नकुल नाथ 660 कोटींहून अधिक मालमत्तेसह पहिल्या क्रमांकावर आहेत. उत्तर-मध्य मुंबईतील कॉंग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांचे वार्षिक उत्पन्न सर्वाधिक म्हणजेच 13 कोटींहून अधिक आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.