व्हॉट्‌सअप व्हिडीओ कॉलिंगद्वारे लोकअदालतमध्ये दावा निकाली

मृत्यू झालेल्याच्या कुटुबियांना 16 लाख भरपाई

पुणे – अपघातात मृत्यु झालेल्या टेलर व्यक्तीच्या कुटुंबियांना 16 लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. शनिवारी झालेल्या लोकअदालत मध्ये व्हॉट्‌सअप व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातुन हा दावा निकाली काढण्यात आला. मोटार अपघात न्यायप्राधिकणाचे सदस्य न्यायाधीश प्रदीप अष्टूरकर, ऍड. अतुल गुंजाळ आणि ऍड. जयश्री वाकचौरे यांच्या पॅनलने हा दावा निकाली काढला.

लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर पहिल्यांदाच शनिवारी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रथमच व्हॉट्‌सअप व्हिडीओ कॉलिंगचा वापर करण्यात आला. या सुविधेचा वापर करण्यास महाराष्ट्र राज्य विधी प्राधिकरणातर्फे परवानगी देण्यात आली होती. संबंधित दाव्यात पक्षकारांची
अधिकृत ओळख तपासून या सुविधेचा वापर करुन दावे निकाली काढण्यात आले.

खंडू डाळींबे (वय-50) यांचा सोलापूर जिल्ह्यातील कुर्डवाडी- बार्शी येथे रस्तावर झालेल्या अपघातात मृत्यु झाला होता. खंडू हे मुळचे कुर्डूवाडी येथील असून, चाकण येथे शिवणकाम करत होते. घटनेच्या दिवशी खंडू दुचाकीने कुर्डूवाडी येथून बार्शीकडे जात होते.

त्यावेळी ट्रकने दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये खडू यांचा मृत्यू झाला. पत्नी नंदा खंडू डाळींबे, मुलगा राकेश, मुली राधा आणि राजेश्‍वरी यांनी ऍड. अतुल गुंजाळ यांच्यामार्फत बजाज फायन्सस इन्सुरन्स कंपनीच्या विरोधात मोटार अपघात न्यायप्राधिकरणात येथे दावा दाखल केला. 20 लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी न्यायालयात करण्यात आली. मात्र, तडजोडी अंती कुटूबिंयाना 16 लाख रुपये देण्याचे मान्य झाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.