लोहगाव-वाघोली रस्ता पाण्यात 

सहा दिवसांपासून पाणी साचल्याने रस्त्याला तलावाचे स्वरूप 

विश्रांतवाडी – महापालिकेच्यावतीने कोट्यवधी निधी वापरून नुकतेच लोहगाव-वाघोली रस्त्याचे डांबरीकरण केले आहे. या रस्त्यावर असणाऱ्या वर्दळीचा विचार करून रुंदीकरणही करण्यात आले. मात्र, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कसल्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही. परिणामी मागील सहा दिवसांपासून पाणी साचून या रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेला हा रस्ता पाण्यात गेला आहे.

पालिकेच्या नियोजनशुन्य कामामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाहन चालविताना चालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. अनेकजणांना या पाण्यात पडून किरकोळ दुखापत देखील झाली आहे. पालिकेच्यावतीने मात्र तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे. पालिकेच्या पथ विभागाच्यावतीने लोहगाव-वाघोली रस्ता तयार करताना पावसाळी लाईन न टाकल्याने कर्मभूमीनगरजवळ गेल्या सहा दिवसांपासून पाणी साचले आहे. या रस्त्यावर वाहतूक धिम्यागतीने सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.

पाणी साचलेल्या ठिकाणी मोठा खड्डा तयार झाला असून वाहनांचे अपघात होत आहेत. रस्ता तयार करताना रस्ता ओलांडून पावसाळी लाईन टाकली आहे. मात्र, ही लाइन मैलापाणी वाहून नेणाऱ्या लाईनला जोडली आहे. मैलापाणी वाहून नेणारी लाईन लहान असल्याने तसेच ती वारंवार तुंबत असल्याने पाण्याचा निचरा होत नाही. या परिस्थितीबाबत महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर नगररस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी व पथ विभागाचे अधिकारी केवळ जागेवर येऊन पाहणी करून निघून गेले. कोणतीच ठोस उपाययोजना न केल्याने गेल्या सहा दिवसांपासून पाणी रस्त्यावर साचून आहे. याचा नाहक त्रास वाहनचालकांना होत आहे.

हा रस्ता करताना येथे पावसाळ्यात उद्‌भणाऱ्या परिस्थितीचे योग्य नियोजन न केल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नव्याने केलेला रस्ता देखील निकृष्ठ झाला असून ठिकठिकाणी उखडल्यामुळे खड्डे पडले आहेत. याला जबाबदार असणाऱ्या महापालिकेच्या अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी.

– मोहनराव शिंदे-सरकार 

अधिकारी व कर्मचारी जागेवर पाठविले असून पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरू केले आहे.

– भारत मोहिते, उपअभियंता, पथ विभाग 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.