लोहगावमध्येही उभारणार कचरा प्रक्रिया प्रकल्प

स्थायीसमोर प्रस्ताव : 100 टन मिश्र कचऱ्यावर करणार प्रक्रिया

पुणे – लोहगाव आणि परिसरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी त्याच भागात 100 टन मिश्र कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारला जाणार आहे. याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे.
सुमारे 20 कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पासाठी येणार आहे. दरम्यान सोमवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

उरुळी देवाची येथील कचरा डेपो बंद करण्यासाठी महापालिकेकडून करण्यात येत असलेल्या कालबद्ध कार्यक्रमांचा कृती आराखडा “एनजीटी’मध्ये मागील वर्षी सादर करण्यात आला होता. त्यात उरुळी देवाची येथील साठलेल्या कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया करणे तसेच शहरात आणखी 100 टन मिश्र कचऱ्यावर प्रक्रियेसाठीचा प्रकल्प उभारण्याचे प्रतिज्ञापत्र देण्यात आले होते. मात्र, उरूळी देवाची येथे नवीन प्रकल्प उभारणे शक्‍य नाही. त्यामुळे दीड वर्षांपूर्वी महापालिका हद्दीत लोहगाव आले असून येथील जागेत हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. लोहगावसह आसपासच्या भागात दररोज सुमारे 50 टनांहून अधिक मिश्र कचरा तयार होतो. सध्या हा कचरा उरुळी देवाची येथील डेपो मध्ये कॅपिंगसाठी नेला जातो. मात्र, तो याच भागात प्रक्रियेसाठी हा प्रकल्प उभारला जाणार असून त्यासाठीचा प्रस्ताव घनकचरा व्यवस्थापन विभागाने शुक्रवारी ठेवला होता. मात्र, समितीने तो पुढे ढकलला असून “एनजीटी’मध्ये प्रशासनाने दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, तो प्रकल्प बंधनकारक असल्याने सोमवारच्या समितीच्या बैठकीत त्यास मान्यता घ्यावीच लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.