नगर-नाशिकच्या सीमेवर टोळधाड?

शेतकऱ्यांची चिंता वाढली : शिवारातील चारा, गवताचा फडशा

पुणे – नगर-नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वडगाव बक्तरपूर (ता. कोपरगाव) येथे गिन्नी गवतावर नाकतोड्यांचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यांनी गिन्नी गवताचा फडशा पाडला असल्याचे सोमवारी (दि.1) आढळून आले.

याबाबत शेतकऱ्यांनीच कृषी विभागाला माहिती दिली असून तालुका कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून हे नाकतोडे असल्याचे सांगितले. पण, यामुळे या भागातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
या नाकतोड्यांनी गवतावर हल्ला केल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे. मात्र, अन्य पिकांवरही धोका वाढू शकतो असा कृषी विभागाचा अंदाज आहे. काही नाकतोडे आकाराने मोठे तर काही लहान अवस्थेत असून ते स्थानिक भागातीलच असू शकतात, अशी शक्‍यता व्यक्त झाली आहे.

यासंदर्भात माहिती देताना राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सी.एस. पाटील म्हणाले, “शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. नगर कृषी विभागाकडून काही छायाचित्रे पाठवण्यात आली आहेत. त्यावरून ते नाकतोडे असल्याचे दिसते.’

शेतकऱ्यांना सल्ला
सध्याच्या पावसाळी वातावरणात या कीटकांची संख्या कमी-जास्त प्रमाणात वाढू शकते. यासाठी 5 टक्के निंबोळी अर्क किंवा कडुनिंबावर आधारित अझाडिरेक्‍टिन (1500 पीपीएम) या कीटकनाशकाची 3 मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी. अधिक मार्गदर्शनासाठी विद्यापीठाचा सल्ला घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.