विदर्भामार्गे राज्यात टोळधाडीचा शिरकाव…

आकस्मिक हल्ल्याने हादरले शेतकरी

पुणे (प्रतिनिधी)– एकीकडे करोनाच्या संकटाशी मुकाबला करत असतानाच दुसरीकडे राज्यावर आणखी एक संकट आलं आहे. पाकिस्तानमधून आलेली टोळधाड मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आली आहे. मध्यप्रदेशाच्या सीमेवरून मोर्शी, वरूड व मेळघाटात टोळधाड दाखल झाली आहे. ताशी 12 ते 16 किलोमीटरच्या वेगाने ही टोळधाड पुढे सरकत आहे. टोळधाडीने मोर्शी तालुक्‍यात आक्रमण केल्यानंतर वरूड तालुक्‍यात शिरकाव केला आहे.

या आकस्मिक हल्ल्याने शेतकरी तसेच संत्रा बागायतदार शेतकरी हादरून गेले आहेत. ही टोळधाड पालेभाज्यांसह हिरव्या वृक्षांची पाने खात आहेत. लाखोंच्या संख्येनं आलेले टोळ पिकांचा फडशा पाडत असल्यानं कोट्यवधींचं नुकसान होण्याची भीती व्यक्‍त होत आहे. ही नाकतोड्याच्या गटातील तांबूस रंगाची वाळवंटी टोळ असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. इराण आणि पाकिस्तानमधील बलुचिस्तान येथे जन्मलेले आणि परिपक्‍व झालेले हे टोळ राजस्थानमध्ये दाखल होऊन इतर राज्यांमध्ये पसरले आहेत.

राज्यामध्ये सध्या उन्हाळी मूग, कापूस, उडिद, मका, मिरची, भाजीपाला आणि फळबागा पिके शेतकऱ्यांनी जिवापाड जोपासली आहेत. शास्त्रज्ञांच्या मते, टोळधाडीवर वेळीच नियंत्रण आणले नाही आणि टोळ असेच विस्तारत राहिले तर सर्व पिके फस्त होतील. यामुळे शेतकऱ्यांना हजारो कोटी रुपयांचा फटका बसेल. त्यामुळे टोळधाडीवर वेळीच उपाय करणे गरजेचे आहे.

रब्बी हंगामातच टोळधाड राज्याच्या काही भागात येण्याची शक्‍यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आली होती. त्या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाने महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास मंडळाला या किडीच्या नियंत्रणासाठी कीडनाशकांचा पुरवठा करण्याचे आदेश देखील यापूर्वीच दिले आहेत. टोळधाडीच्या नियंत्रणाकरिता तज्ज्ञांचे एक पथक पाठविण्यात आले आहे. त्यांच्या शिफारशीनुसार कीडनाशकांची फवारणी केली जाईल. सध्या प्रादुर्भाव कमी असल्याने हवेतून फवारणीची गरज नाही.
-सुहास दिवसे, कृषी आयुक्‍त

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.