- मध्यप्रदेश ते पुणे केला बसने प्रवास; तरुणांच्या दक्षतेमुळे पुन्हा पालकांच्या ताब्यात
पिंपरी – लॉकडाऊनमध्ये घरात बसून कंटाळलेल्या एका अल्पवयीन मुलीने अचानक घर सोडले. मध्यप्रदेश ते पुणे असा बसने प्रवास केला. पुण्यात आल्यानंतर आई-वडिलांची आठवण होऊ लागल्याने मुलगी घाबरली. दक्ष तरुणांनी तिला पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी तीन तासात शोध घेऊन तिला पुण्यातील नातेवाइकांच्या ताब्यात दिले.
वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 22) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास सोपान पौळ या तरुणाने एका अल्पवयीन मुलीला वाकड पोलीस ठाण्यात आणले. ती मुलगी रस्ता चुकली असून तिला तिच्या आई-वडिलांकडे जायचे असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मुलगी देखील अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत होती. ती एकसारखी रडून ‘मला आई-वडिलांकडे सोडा’ असे म्हणत होती. पोलिसांनी तिला शांत केले आणि विश्वासात घेऊन तिच्याकडे विचारपूस केली.
ती मुलगी मध्य प्रदेशमधील खंडवा येथील असल्याचे तिने सांगितले. लॉकडाऊनमध्ये घरात बसून कंटाळा आल्याने ती मुलगी घरामधून गुपचूप पाच हजार रुपये घेऊन बाहेर पडली. 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता बसने पुण्याला आली. 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता पुण्यात उतरली. पोलिसांनी तिच्याकडे आणखी चौकशी करून तिच्या भावाचा संपर्क क्रमांक मिळवला आणि त्याच्याशी संपर्क केला.
दरम्यान मुलीचे पालक खंडवा पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी गेल्याचे वाकड पोलिसांना समजले. वाकड पोलिसांनी खंडवा पोलिसांना मुलगी सुखरूप असल्याचे सांगितले. खंडवा येथून तात्काळ पुण्याला येणे शक्य नसल्याने मुलीच्या आईवडिलांनी त्यांच्या पुण्यातील नातेवाइकांना वाकड पोलीस ठाण्यात पाठवले. पुण्यातील नातेवाइकांची ओळख पटवून वाकड पोलिसांनी मुलीला त्यांच्याकडे सुखरूपपणे सुपूर्द केले. दरम्यान मुलीने एक मोबाइल फोन घेतला होता. मोबाइल दुकानदाराची माहिती काढून मोबाईल परत करून मुलीला तिचे पैसेही पोलिसांनी परत मिळवून दिले.
ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक विकास मडके, कर्मचोरी जगताप, तोडकर, महिला पोलीस शिपाई शिंदे यांनी केली. या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यांनी पथकाचे कौतुक केले.