LockdownUpdates : आमच्याकडे ‘पॉवर’, पण सहकार्य करा; पोलीस महासंचालकांचे आवाहन

मुंबई  – राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. तर कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आपण राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे जनतेने सहकार्य करावे. आम्ही कुणालाही विनाकारण त्रास देणार नाही. पण जाणूबुजून संचारबंदीचा भंग करून आम्हाला लाठीचा वापर करण्याची वेळ आणू नका, असे आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी केले. तसेच राज्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पासची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र जर पोलिसांनी याबाबत विचारणा केली तर कारण मात्र सांगावे लागणार आहे.

राज्यात संचारबंदी लागू होण्यासाठी अवघे काही तास उरलेले असतानाच पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. राज्यात 144 कलम लागू होत आहे. त्यामुळे लोकांनी घराबाहेर पडू नये. जर खरोखर काम असेल आणि कोणी बाहेर पडले असेल तर हरकत नाही. मात्र, जाणूनबुजून नियमांचा भंग करून आमच्यावर लाठी वापरण्याची वेळ आणून नका, असे पांडे म्हणाले.
कुणी जाणीवपूर्वक नियमांचे उल्लंघन करत नसेल तर काठीचा उपयोग करु नका. अति उत्साहीपणा दाखवू नका. आम्हाला कारवाई करायची नाही. ती वेळ तुम्ही येऊ देऊ नका. पण कुठे तरी जाळपोळ, पब्लिक प्रॉपर्टी नासधूस होत असेल तर आम्ही काहीच करणार नाही असा याचा अर्थ नाही. असे काही चित्र दिसल्यास नाईलाजाने आम्हाला बळाचा वापर करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

आमच्याकडे पॉवर, पण सहकार्य करा
पोलिसांकडे पॉवर आहेत, ऍक्‍ट आहेत, आम्ही त्याचा कमीत कमी वापर करू. मात्र लोकांनी सहकार्य केले नाही तर कारवाई निश्‍चित होणार, त्यात वाद नाही. आम्हाला कारवाई करायची नाही. विनाकारण कारवाई करायची नाही याची हमी देतो. पण तुम्हीही कायद्याचा आदर करा. सहकार्य करा, असे आवाहनही त्यांनी केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.