नवी दिल्ली : कोरोनामुळे संपूर्ण जग हतबल असून जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशातच मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोरोनाशी लढणाऱ्या फ्रान्समध्ये हा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. आता फ्रान्समध्ये 11 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रो यांनी यासंदर्भात घोषणा केली. तसेच जगभरात आतापर्यंत 19 लाखांहून अधिक लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे.
L’espoir renaît. Mais rien n’est acquis. Le confinement doit continuer jusqu’au lundi 11 mai.
— Emmanuel Macron (@EmmanuelMacron) April 13, 2020
फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रो यांनी ट्विटरवर लिहिले, ‘देशामध्ये 11 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. तसेच आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, या लॉकडाऊनच्या काळात कोरोना व्हायरस व्यतिरिक्त दुसऱ्या आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्ती हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतील. त्यांनी लिहिले आहे की, 11 मेनंतर हळूहळू शाळा सुरू करण्यात येतील.
जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत 1,19,413 लोकांचा मृत्यू झाला आहे. याव्यतिरिक्त आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 18 लाख पार पोहोचली आहे. जगभरात आतापर्यंत 19,20,258 लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. अमेरिकेत सर्वाधिक कोरोना बाधित असून जगभरातील सर्वाधिक मृतांची संख्याही अमेरिकेत आहे. अमेरिकेमध्ये आतापर्यंत 5 लाखांहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. तर 22 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव इटली, स्पेन, फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये आहे.