लॉकडाऊनला 2 आठवड्यांच्या मुदतवाढीवर विचार सुरू

पंतप्रधानांनी केली मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा

नवी दिल्ली : करोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या देशभर लागू असलेल्या लॉकडाऊनला 14 एप्रिलच्या पुढेही आणखी दोन आठवड्यांची मुदतवाढ देण्यावर केंद्र सरकार विचार करीत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. त्याचर्चेदरम्यान पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांना आपापल्या राज्यांमधील आरोग्य स्थितीवर लक्ष केंद्रीत करण्याची सूचना केली. बहुतेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनला दोन आठवड्यांची मुदतवाढ देण्याची विनंती पंतप्रधानांना केली. त्यानुसार केंद्र सरकार या विनंतीवर विचार करत आहे, असे सरकारी प्रवक्‍त्याने सांगितले.

लॉकडाउनमध्ये वाढ होण्यामुळे आर्थिक व्यवहारांना चालना देण्यासाठी काही सवलती दिल्या जाऊ शकतात आणि या प्रस्तावांमध्ये विषाणूचा कमी प्रभाव असलेल्या भागात कमी निर्बंध लागू केले जाऊ शकण्याचे संकेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. लॉकडाऊनला मुदतवाढ दिली गेली तर हे 2 आठवड्यांचे लॉकडाऊन सध्या सुरू असलेल्या 3 आठवड्यांच्या लॉकडाऊनपेक्षा अधिक वेगळे असेल, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनंतर सांगितले.

पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की लॉकडाउन विस्तार अपरिहार्य आहे आणि दोन दिवसात पुढील 15 दिवसांच्या अंमलबजावणीबद्दल मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील, असे ते म्हणाले. या व्हिडीओ कॉन्फरन्सदरम्यान पंतप्रधान मोदींनी स्वतः घरगुती बनावटीचा मास्क घातला होता. “जान भी, जहान भी’ असे सांगून त्यांनी आरोग्य आणि समृद्धी या दोन्हीवर लक्ष केंद्रीत करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांना केली.

“जर प्रत्येक नागरिकाने या दोन्ही बाबी लक्षात ठेवून आपले कार्य केले आणि शासनाच्या निर्देशांचे पालन केले तर ते करोना विषाणू विरूद्धचा लढा आणखी समर्थ होईल.’ असे ते म्हणाले.
लॉकडाऊन दरम्यान आवश्‍यक ती कामे करण्यासाठी शेतकरी व उद्योग संस्थांनी काही सवलतींची मागणी केली आहे.

पंतप्रधानांबरोबरच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगदरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन किमान पंधरवड्यापर्यंत वाढवण्याची सूचना केली आहे. ओडिशा आणि पंजाबने यापूर्वीच अनुक्रमे 30 एप्रिल आणि 1 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे. सध्या चालू असलेल्या लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी केली होती आणि त्याची मुदत 14 एप्रिलपर्यंत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.