लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी व्हावी

संजय मल्होत्रा : केंद्रीय पथक पुण्यात दाखल

पुणे – पुणे जिल्ह्यात सर्व विभाग समन्वयाने काम करीत आहे, ही समाधानाची बाब असली तरी करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी. तसेच अन्नधान्याचे वितरण व्यवस्थित करावे आणि नागरिकांमध्ये विश्‍वास निर्माण करावा, अशा सूचना केंद्रीय मंत्रालयाचे अपर सचिव संजय मल्होत्रा यांनी दिल्या.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पुण्यात आले आहे. या पथकाने करोनाबाधित रुग्ण व मृत्यूचे प्रमाण या अनुषंगाने माहिती जाणून घेतली. केंद्रीय मंत्रालयाचे अपर सचिव मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्‍त कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाचे सहसल्लागार डॉ. पवनकुमार सिंग, अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे संचालक करमवीर सिंग, आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे उपसचिव डॉ. आशीष गवई, आरोग्य सेवेचे अतिरिक्‍त महासंचालक पी. के. सेन हे उपस्थित होते.

प्रारंभी विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. विभागात पुणे शहरात प्रमाण अधिक आहे. एक तर येथील लोकसंख्या आणि झोपडपट्टीचे कारण असले तरी ज्या व्यक्‍तींचा मृत्यू झालेला आहे, त्यामध्ये 55 ते 70 वयोगटातील संख्या अधिक आहे. शिवाय, बहुतांशी लोकांना उच्च रक्‍तदाब, मधुमेह यासारखे आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. असे असले तरी प्रशासनाने अगदी सुरुवातीपासूनच खबरदारी व दक्षता घेतली आहे, असे ते म्हणाले.

पुण्याचे पोलीस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम्‌ यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आणि लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणीसाठी पोलीस करीत असलेल्या प्रयत्नांबाबत माहिती दिली.
पुणे मनपा आयुक्‍त शेखर गायकवाड व अपर आयुक्‍त रुबल अग्रवाल यांनी आरोग्य विषयक परिस्थितीची माहिती देताना शहरातील रुग्णालय सक्षम केले असून काही रुग्णालयांबरोबर करार केला आहे. भविष्यात करोनाच्या अनुषंगाने गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर आपली तयारी असावी, अशा पद्धतीने नियोजन केले आहे, याविषयी माहिती दिली. शिवाय, मनपातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

पिंपरी-चिंचवड मनपाचे आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी आम्ही सुरुवातीपासूनच दक्षता घेतलेली आहे. आमच्या भागात बाधितरुग्ण व मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी आम्ही गाफील नाही. सातत्याने उपाययोजना व जनजागृती करीत आहोत.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ससून रुग्णालय अंतर्गत अकरा मजली इमारतीत नव्याने कोविड रुग्णालय विक्रमी वेळेत सुरू केले. तसेच, अडकून असलेल्या मजूर व कामगारांची निवास व भोजनाची व्यवस्था प्रशासन व विविध संस्थांच्या माध्यमातून केली आहे. येत्या काही दिवसांत करोनाला अटकाव करण्यात यश मिळेल,असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनीही केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.

“स्मार्ट सिटी वॉर रुम’ची पाहणी
पुणे महापालिकेंतर्गत स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लि.च्या कार्यालयामध्ये करोना विषयीच्या अद्ययावत माहितीकरिता सुरू करण्यात आलेल्या “स्मार्ट सिटी वॉर रुम’ची केंद्रीय स्तरावरील पथकाने पाहणी केली. यावेळी “स्मार्ट सिटी वॉररुम’मध्ये “संयम’ या संगणक प्रणालीद्वारे करोना विषयीची माहिती प्राप्त करून घेण्यात येते. यामुळे पुणे शहरामध्ये वॉर्डनिहाय होम क्वारंटाइन बाधितांच्या हालचालींविषयी माहिती तत्काळ नियंत्रण कक्षामध्ये प्राप्त होते. दर दहा मिनिटांनी यावर माहिती अद्ययावत होत असते. यामुळे डाटा प्राप्त होताच त्यावर तातडीने पुढील कार्यवाही करणे शक्‍य होते. यामध्ये रेड झोन, ऑरेंज झोन तसेच ग्रीन झोनमधील वॉर्ड निहाय बाधितांची माहिती तसेच पुणे शहरामधील विविध ठिकाणच्या रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांच्या अद्ययावत माहितीचे एकत्रिकरण करण्यात येते व त्यानुसार नियोजन करण्यात येते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.