चंदीगड- देशातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांची संख्या 3 लाखांच्यावर गेली आहे. देशातील अनेक राज्यांमधील करोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी करोना संसर्ग रोखण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यानुसार आता पंजाबमध्ये वीकेंडच्या दिवशी लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने लॉकडाउनच्या पाचव्या टप्पात काही शिथिलता जाहीर केली आहे. परंतु शिथिलता जाहीर केल्यानंतर अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालनही होताना दिसून येत नाही. यामुळे पंजाब सरकारने साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी केवळ आवश्यक वस्तूंची दुकाने खुली करण्यास परवानगी दिली आहे. तसेच दूसऱ्या राज्यांमधून येणाऱ्या नागरिकांवर देखील प्रतिबंध लावले आहेत. ज्यांच्याकडे प्रवेश पास असेल अशाच लोकांना प्रवेश दिला जाणार आहे.
वीकेंडच्या दिवशी केवळ मेडिकल स्टोअर आणि अत्याआवश्यक सेवेतील लोकांनाच बाहेर पडण्यास परवानगी असेल. अमरिंदर सिंग यांनी शुक्रवारी (12 जून) अधिकाऱ्यांसोबत शुक्रवारी महत्त्वाची बैठक घेतली. यात राज्याला करोनापासून वाचवण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यानंतर पंजाब सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या.