चिंबळी (वार्ताहर) – खेड तालुक्याच्या दक्षिण भागातील निघोजे, कुरूळी, मोई, सोळू, चिंबळी, मरकळ गावात करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या सहाही गावांत अत्यावश्यक सेवा वगळून सोमवार (दि. 6) ते सोमवार (दि. 13) लॉकडाऊन करण्यात आले आहे. चारही गावांत निर्जंतुकीकरण करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. दरम्यान, मरकळ येथे मंगळवारी (दि. 7) भरणारा आठवडे बाजारही रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती सरपंच स्मिता लोखंडे यांनी दिली.
चिंबळीत सोमवारी दोन, दहा दिवसांपूर्वी कुरूळीतील डोंगरे वस्तीत, मोई येथे दोन दिवसांपूर्वी दोन तसेच मरकळ व सोळू परिसरातही रूग्ण आढळून आले आहेत. खबरदारीचे उपाय म्हणून करंजविहिरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने मोई, कुरूळी, निघोजे, चिंबळी परिसरातील कुटुंबाची माहिती घेऊन जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली, अशी माहिती आरोग्य अधिकारी जयश्री महाजन यांनी दिली. तर मरकळ व सोळू येथे शेलपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने मोहीम सुरू असल्याचे आरोग्य अधिकारी इंदिरा पारखी यांनी सांगितले.