करोनाची लाट थोपवण्यासाठीच लॉकडाऊन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

व्यापाऱ्यांनीही या लढ्यात सहकार्य करावे

मुंबई – राज्यात आलेली करोनाची लाट थोपवण्यासाठीच लॉकडाऊन किंवा निर्बंधांचे पाऊल उचलण्यात आले आहे. ते कुणा विरोधात नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही या लढ्यात शासनाला सहकार्य करावे. त्यांचे नुकसान होऊ नये अशीच भूमिका आहे. व्यापाऱ्यांनीही करोना नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल. त्यांच्या मागण्या, सूचनांचा गांभिर्याने विचार करून उपाय योजना केल्या जातील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

राज्यातील विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकारी, प्रतिनिधींशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दूरदृश्‍य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी न डगमगता, सर्वांनी एकजूटीने प्रयत्न करूया, असे आवाहनही आज त्यांनी केले.

मुख्यमंत्री म्हणाले, आताची परिस्थिती फार विचित्र आहे. करोनाचे हे संकट दुर्दैवी आहे. ही लाट प्रचंड मोठी आहे. कोणत्याही गोष्टी बंद करण्याची भूमिका नाही, हे यापुर्वीच स्पष्ट केले आहे. कुणाच्याही रोजी-रोटीवर निर्बंध आणावेत किंवा लॉकडाऊन करावे अशी इच्छा नव्हती. याआधीपासून सर्व जनतेला सावध करत होतो. फेब्रुवारी-मार्चमध्ये काही शेकड्यांमध्ये रुग्णसंख्या खाली आणली होती. पण आता रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे.

गेल्यावर्षी मार्चमध्ये बेडसची संख्या सात-आठ हजार होती. ही संख्या आता पण पावणेचार लाखांपर्यंत वाढविली आहे. जंम्बो कोविड सेंटर्स काढली. कोणत्याही राज्याने केली नसेल अशा सुविधा निर्माण केल्या. पण या सुविधाही अपुऱ्या पडण्याची वेळ येईल, अशी स्थिती येण्याची शक्‍यता आहे.

व्यापाऱ्यांनीच दिलेल्या माहितीनुसार मुंबईतच कामगारांची संख्या लाखोंची असल्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले, या कामगारांचा प्रवास, येण्या-जाण्यामुळे किंवा संपर्कामुळे संसर्ग वाढण्याची शक्‍यता आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. 

दुर्दैवाने करोनाचा पहिला घाला मुंबईवर झाला. आता दुसरा हल्लाही आपल्यावरही झाला आहे. बाहेरच्या राज्यातून आणि परदेशातूनही येणे जाणेही मुंबईत मोठ्या प्रमाणत आहे. त्यामुळे मुंबईची सुरक्षा नीट ठेवली, तर राज्याची आणि देशाची सुरक्षा नीट राहील. त्यासाठी यापुर्वीच खासगी कार्यालयांना कामांच्या वेळांमध्ये बदल करण्याचे, वेगवेगळ्या शिफ्ट करण्याचे आवाहन केले होते.

खरेतर, दुकाने चोवीस तास उघडी ठेवा असे आवाहनही केले होते. जेणेकरून गर्दी कमी होईल. आताही हेतू दुकाने बंद करणे हा नाही. तर गर्दी टाळणे हा आहे. यापुर्वी आपण सामाजिक अंतराचे चौकोन आखले होते. त्यातून परिश्रमाने, मेहनतीने पहिल्या लाटेवर मात केली होती. यात धारावी पॅटर्नचे जगभर कौतूक केले होते. पण आता परिस्थितीच विचित्र झाली आहे.

नव्या लाटेत आता तरूणवर्ग

लसीकरण सुरु झाले. पण लसींचा साठाही आता संपून जाणार आहे. कारण आपली लसीकरणाची गती मोठ्याप्रमाणात वाढवली आहे. पंचवीस वर्षांवरील सर्वांना लस देण्याची मागणी केंद्राकडे केली होती. पण ती नाकारण्यात आली. आपल्या मागणीवरून आता पंचेचाळीस वर्षांवरील लोकांना लस देण्यात येत आहे. पण लसीचा साठा संपू लागला आहे.

नव्या लाटेत आता तरूण वर्ग यामध्ये मोठ्या प्रमाणात बाधित होऊ लागला आहे. कारण तो रोजगार, कामांसाठी फिरतो आहे. लक्षण नसलेल्यांची संख्या सत्तर टक्‍क्‍यांहून अधिक वाढली आहे. त्यांच्यामुळे इतर अनेक बाधित होण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.