लखनौ – उत्तर प्रदेश सरकारने आपल्या राज्यातील वीकएंड लॉकडाऊनची मुदत 10 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाची संचारबंदी शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून मंगळवारी सकाळी 7 वाजेपर्यंत होती. ती आता सोमवारी 10 मेपर्यंत लागू राहणार आहे.
तोपर्यंत स्थिती नियंत्रणात नाही आली तर हा लॉकडाऊन आणखीही वाढवला जाऊ शकतो, असे राज्य सरकारच्या सूत्रांनी सांगितले. त्याचा निर्णय रविवारी घेतला जाणार आहे.
राज्य सरकारी अधिकाऱ्यांनी या निर्बंधांसाठी लॉकडाऊन हा शब्दप्रयोग वापरण्यास नकार दिला. त्याऐवजी बंद हा शब्दप्रयोग वापरला जाईल, असे ते म्हणाले.
उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात करोना रुग्णांचे निधन झाले आहे. त्यामुळे येथे त्वरित संचारबंदीसारखे उपाय लागू करा, अशी सूचना अलाहाबाद हायकोर्टाने राज्य सरकारला केली होती.