सिमला -हिमाचल प्रदेशमधील हमिरपूर आणि सोलन या दोन जिल्ह्यांत 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. देशव्यापी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची मुदत 31 मे यादिवशी समाप्त होणार आहे. मात्र, त्यापुढे आणखी महिनाभर लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय हमिरपूर आणि सोलनच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला.
हिमाचलमध्ये आतापर्यंत 218 करोनाबाधित आढळले आहेत. त्यातील हमिरपूरमध्ये सर्वांधिक 63 बाधित आहेत. तर सोलनमध्ये 21 बाधित आढळले आहेत. आता त्या जिल्ह्यांत पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत संचारबंदी लागू असेल. देशाच्या इतर भागांमधून हिमाचलचे रहिवासी परतत असल्याच्या पार्श्वभूमीवर तो निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, सिमला जिल्ह्यातील जमावबंदीही 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. काही जिल्ह्यांतील निर्बंध वाढवणारे हिमाचल हे पहिलेच राज्य ठरले आहे.