-->

आज रात्री 12 वाजेपासून देशभरात ‘लॉक डाउन’, घराबाहेर पडण्यावर पूर्ण बंदी- पंतप्रधान

नवी दिल्ली : देशात पुढील तीन आठवडे म्हणजे 21 दिवस संपूर्ण देशांत लॉकडाऊन करण्यात येणार आहे. ही एका प्रकारची संचारबंदीच आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

कोरोनाला आपण पराभूत केले नाही तर आपण अनेक वर्ष मागे पडू, असा इशारा देत ते म्हणाले, हिंदुस्थानला वाचवण्यासाठी, आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी हे पाऊल उचलणे आवश्‍यक आहे,या काळात आपल्या घराबाहेर पडण्यास पूर्ण मनाई आहे. त्यामुळे माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की आपण आहात तेथेच रहा. आपण आपल्या घरात राहणे हे प्रत्येक घराच्या दृष्टीकोनातून महत्वाचे आहे. जर हे बंधन पाळले गेले नाही तर अनेक परिवार बरबाद होऊन जातील, असे ते म्हणाले.

या निर्णयाने आपल्या घराबाहेर एक लक्ष्मणरेषा आखली आहे. आपले घराबाहेर टाकलेले एक पाऊल कोरोना घरात आणू शकते, असा इशारा देत पंतप्रधानांनी काही जणांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्याची लक्षणे दिसायला काही काळ जावा लागतो. मात्र त्या काळात त्यांच्या संपर्कात येणाऱ्या शेकडो जणांना कोरोनाची बाधा करू शकतात, असे सांगितले.

हा लॉकडाऊन जनता कर्फ्यूपेक्षा अधिक सक्त असेल असे स्पष्ट करत ते म्हणाले, या काळात आपण आपल्या घरातच रहा. या संकटाचा काळ गरीबांसाठी कसोटीचा काळ आहे, याची कल्पना आहे. जीवन वाचवण्यासाठी सर्व काही हाच निर्धार केला पाहिजे.
कोरोना उपचारासाठी केंद्र सरकारने 15 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून कोरोनाची चाचणी, व्यतक्तीगत उपचार, विलगीकरण कक्ष अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटर्सची उत्पादन यासाठी विनियोग केला जाणार आहे. केवळ आरोग्य क्षेत्र हीच प्राथमिकता असेल, असे आदेश मी सर्व राज्यांना दिले आहेत.

या काळात अफवा पसरवल्या जातील. अफवा पसरण्याचा वेगही खूप जास्त असतो. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नका. सर्व भारतीयांनी सरकारच्या सुचनांचे पालन करावे, असे सांगून ते म्हणाले, आत्मविश्‍वासाने आपण संकल्प करा. संयम ठेवा आपला संयमाचा संकल्प विजयाच्या संकल्पात परावर्तीत होऊ द्या.

या संकटाला पराभूत करण्यासाठी घरात बाहेर पडणार नाही हाच एकमेव मार्ग आहे, असे ते म्हणाले. देशाचे आरोग्य क्षेत्रात काम करणारे कर्मचारी आपला जीव धोक्‍यात घालून काम करत आहेत. आपले आरोग्य कर्मचारी आपले सार्वजनिक ठिकाणे निर्जंतुकीकरण करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे या विषाणूचे नामोनिषाण राहणार नाहीत. माध्यमांचे प्रतिनिधी आपले जीव धोक्‍यात घालून रुग्णालयात, रस्त्यावर उतरून काम करत आहेत. पोलिस आपले कुटूंब सोडून रस्त्यावर उतरून काम करत आहेत. आपले कर्तव्य बजावताना ते अनेकांच्या रागाला सामोरे जात आहेत. या साऱ्या घटकांचा आपण विचार करा. त्यांच्यासाठी आपण घरात राहा, असे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.