नागरिकांची करोना रॅपिड अँटीजेन टेस्ट होणार
तळेगाव दाभाडे – “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या शासनाच्या योजनेतर्गंत तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत करोना रॅपिड अँटिजेन टेस्ट गुरुवारी (दि. 24) संपूर्ण तळेगावात शहराच्या हद्दीत राबविण्यात येणार आहे. एक दिवसाचा संपूर्ण लॉकडाऊन असेल, अशी माहिती मावळ-मुळशीचे प्रांत संदेश शिर्के यांनी दिली.
तळेगाव दाभाडे नगरपरिषद सभागृहामध्ये मंगळवारी (दि. 22) झालेल्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, तळेगावच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, मुख्याधिकारी रवी पवार, वैद्यकीय अधिकारी गुनेश बागडे, उपमुख्य अधिकारी सुप्रिया शिंदे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये राबविण्यात येणाऱ्या अँटिजेन टेस्ट बाबतच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. याबाबत संपूर्ण तळेगावातील 13 प्रभागांमध्ये पूर्ण नियोजन झाले. तळेगावातील चार ठिकाणी तपासणी केंद्र उभारण्यात येणार आहे. प्रत्येक प्रभागांमध्ये दोन लॅब टेक्निशन, वैद्यकीय अधिकारी, स्वयंसेवक यांची नेमणूक केली आहे.
तपासणी कारणाऱ्या स्वयंसेवकास नागरिकांमध्ये करोना विषाणू असल्याची लक्षणे आढळल्यास त्याची तपासणी गाव भागामध्ये कन्या शाळा, नगरपरिषद क्रीडा संकुल, तर स्टेशन भागामध्ये नवीन समर्थ विद्यालय, संत ज्ञानेश्वर शाळा याठिकाणी ही लक्षणे आढळणाऱ्या नागरिकाची अँटिजेन टेस्ट होणार आहे.
ज्या शासकीय कर्मचाऱ्यावर या अँटिजेन टेस्ट सर्व्हेमध्ये कामाची जबाबदारी सोपवलेली आहे. त्यांनी जर कामचुकारपणा केला. तर त्याची गय केली जाणार नाही, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी यावेळी तंबी दिली.