सासवड (प्रतिनिधी) – येथील नगरपरिषद हद्दीतील लांडगे आळी येथे करोना रुग्ण आढळल्यामुळे दौंड पुरंदर उपविभागीय अधिकारी यांनी शहरी भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. मंगळवार (दि. 2 जून) पर्यंत टाळेबंदी जाहीर केली आहे.
प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये स्थानिक परिस्थिती पाहून 30 मे पर्यंत सर्व रुग्णालये, औषध दुकाने, लॅब, रेशन दुकान, शासकीय आस्थापना, बॅंक वगळून सर्व बंद ठेवण्यात आले होते. सध्या दि.31 ते 2 जूनपर्यंत तीन दिवस कंटेन्मेंट झोनमधील संपूर्ण गावठाणमधील छत्रपती शिवाजी महाराज शॉपिंग सेंटर, कऱ्हाबाई मंदिर, जेजुरी नाका ते सोपानदेव मंदिर क्षेत्रांमध्ये पूर्णपणे टाळेबंदी राहणार आहे. यामध्ये दवाखाने, औषधे, रेशन दुकाने, लॅब, घरपोच सेवा सुरू राहिल.
शासकीय कार्यालयांच्या वेळेत व बॅंका सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत सुरू राहतील. गावठाण क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रामध्ये फिरता स्वरूपाचा भाजीपाला विक्री सकाळी नऊ ते दुपारी एकच्यादरम्यान करता येईल. दूध विक्रीची दुकाने सकाळी सहा ते सकाळी नऊ वाजेपर्यंत, किराणा माल, जीवनावश्यक वस्तूंची किरकोळ विक्री सकाळी नऊ ते दुपारी एकपर्यंत सुरू राहिल.