कुआलालंपूर – मलेशियामध्ये गेल्या महिन्यापासून सुरू असलेला लॉकडाऊन बेमुदत वाढवण्यात आला आहे. करोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढतीच राहिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
दैनंदिन बाधितांची संख्या 4 हजारांपेक्षा कमी होत नाही, लसीकरणाचे प्रमाण 10 टक्के होत नाही आणि रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील रुग्णांचे प्रमाण कमी होत नाही तोपर्यंत कोणतेही निर्बंध शिथिल केले जाणार नाहीत, असे मलेशियाचे पंतप्रधान मुहिद्दीन यासिन यांनी सांगितले आहे. हे सर्व अपेक्षित परिणाम जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत मिळण्याची अपेक्षाही पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.
मलेशियामध्ये सध्या लागू असलेल्या लॉकडानची मुदत सोमवारी संपणार होती. मात्र, देशभरात सध्या दररोज सापडणाऱ्या रुग्णांची संख्या 5 हजारांच्या वरच आहे. आज देशात 5 हजार 586 जणांना करोनाची बाधा झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
आतापर्यंत मलेशियामध्ये 7 लाख 37 हजार जणांना करोनाची बाधा झाली आहे आणि 5 हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्य झाला आहे. मलेशियातील 3 कोटी 30 लाख लोकसंख्येपैकी जेमतेम 6 टक्के नागरिकांचे लसीकरण आतापर्यंत पूर्ण झाले आहे. सरकारने लसीकरणाचा वेग वाढवला आहे.
दैनंदिन बाधितांची संख्या 9 हजारांवर पोहोचल्यावर 1 जूनपासून मलेशियाने सर्व आर्थिक आणि सामाजिक उपक्रम थांबवलेले आहेत. मलेशियाने लागू केलेला हा दुसरा देशव्यापी लॉकडाऊन आहे.