थिरूवनंतपूरम – केरळमधील लॉकडाऊनला 9 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे ते राज्य महिनाभरासाठी लॉक राहणार आहे.
देशातील इतर राज्यांप्रमाणे केरळला करोनाच्या दुसऱ्या लाटेने त्रस्त केले. त्यामुळे त्या राज्यात करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी 8 मेपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्याला याआधी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. लवकरच लॉकडाऊनची मुदत संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर तो आणखी आठवडाभरासाठी वाढवण्यात आला.
केरळमध्ये शनिवारी 23 हजार 513 नव्या करोनाबाधितांची आणि 198 बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. त्या राज्यातील एकूण बाधितांची संख्या 24 लाख 64 हजारांवर पोहचली आहे. तर, करोना संसर्गाने आतापर्यंत केरळमध्ये 8 हजार 455 बाधित दगावले आहेत.