पुणे – कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून भारतातही कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरला आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी देशभरात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊन मुळे सतत व्यग्र असणारी कलाकार मंडळी आणि सामान्य नागरिक आता घरात बसून आहेत.
दरम्यान, घरात बाल्यामुळे काहींना आपलं वजन वाढण्याची समस्या सतावत आहे. आज आम्ही तुम्हाला काही खास सोपे व्यायामप्रकार सांगणार आहोत. त्यामुळे तुम्ही स्वतःला उत्तम मेटेंन ठेवू शकता. त्यासाठी तुम्हाला दिवसातील फक्त ३० ते ४० मिनीट द्यावे लागतील आणि व्यायामप्रकारला फारशी जागा पण लागणार नाही.
बिअर क्रॉल्स वर्कआउट : पायात अंतर घेऊन पुशअप्सच्या पोझिशनपासून सुरुवात करा. त्यानंतर डावा पाय आणि उजवा हात पुढे आणत एक स्टेप पुढे जा. आता उजवा पाय आणि डाव्या हाताने पुढची स्टेप घ्या.
जंपींग जॅक : दोन्ही हात सरळ रेषेत शरीराला टेकवून उभे राहा. दोन्ही पाय शरीरापासून आडव्या दिशेत बाहेर घ्या आणि याच वेळी हात खांद्याच्या रेषेत आडवे वर करा. पुन्हा उडी मारून पूर्वस्थितीत या. असं किमान २० वेळा जम्पिंग करा. जंपिंग जॅक केल्यामुळे तुम्हाला तुमचं शरीर हलसं झाल्यासारखं वाटेल.
इंच वर्म : यासाठी आधी सरळ उभं राहत ओणवं होऊन हाताच्या बोटांनी जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. हळूहळू शरीराच्या वरचा भाग जमिनीच्या दिशेने आणा आणि हात पुढे करा. एकदा पुशअप पोझिशनप्रमाणे आल्यावर दोन्ही पाय छोटी स्टेप घेत हाताजवळ आणा. ही क्रिया रिपीट करा.
लंजेस : सरळ उभं राहून हात कमरेवर ठेवा किंवा सरळ रेषेत शरीराला खेटून ठेवा. प्रथम डावा पाय गुडघ्यात वाकवून पुढे न्या. गुडघा पायाच्या अंगठय़ाच्या रेषेपेक्षा पुढे गेला पाहिजे. मागचा पाय गुडघ्यात थोडा वाकवून बॅलन्स करा. पूर्वस्थितीत या आणि आता हीच क्रिया दुसरा पाय पुढे वाकवून करा. गुडघ्यात वाकताना शरीराचा वरचा भाग झुकवू नका. पाठ ताठ राहील. यामुळे शरीर लवचीक होऊन स्नायू बळकट होतात.
माउंटन क्लाइम्बर्स : हा व्यायाम प्रकार करण्यासाठी पुशअप्सच्या पोझिशनपासून सुरुवात करत तुमचा एक पाय हाताजवळ आणा आणि परत तो होता त्या स्थितीत ठेवा. हा प्रकार पुन्हा दुसऱ्या पायासोबतही करा. हा प्रकार शक्य तितक्या वेगात करण्याचा प्रयत्न करा. मांड्याची आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे व्यायामप्रकार फायदेशीर आहेत.