बर्लिन – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पहिल्या टप्प्यात जगभरातील अनेक देशांनी लॉकडाऊन जाहिर केला होता. एकीकडे करोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहिम राबवण्यात आली. पण दुसरीकडे लसीकरण करण्याला नकार देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यामुळे आता करोना लसीकरण न केलेल्या नागरिकांसाठी लॉकडाउनचे निर्बंध लागू केले आहेत. लस न घेतलेल्या नागरिकांना दोन-तीन अत्यावश्यक ठिकाणे वगळता कुठेही जाता येणार नाहीत.
जर्मनीने लसीकरण पूर्ण करण्यासाठी आणि करोनाची संभाव्य चौथी लाट रोखण्यासाठी हा मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय “राष्ट्रीय एकते’च्या भावनेतून घेण्यात आल्याचे जर्मनीच्या मावळत्या चान्सलर एजेंला मर्केल यांनी सांगितले.
लसीकरण झालेल्या नागरिकांना रेस्टोरंट्स, चित्रपटगृह, मनोरंजन स्थळे आदी ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. तर लस न घेतलेल्या नागरिकांना प्रवेश बंदी असणार आहे. फेब्रुवारी महिन्यापर्यंत जर्मनीत लसीकरण अनिवार्य करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, करोनाची जर्मनीतील चौथी लाट आतापर्यंतची सर्वात गंभीर आहे. जर्मनीत काल दिवसभरात आणखी 388 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसरीकडे ओमायक्रॉनमुळे देखील चिंता व्यक्त केली जात आहे.