पणजी – करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता संचारबंदी आणि लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याचे धाडस राज्य सरकारांकडून केले जात नसल्याचे दिसते आहे. महाराष्ट्राने निर्बंध शिथिल करण्याचे संकेत देताना लॉकडाऊन कायम राहण्याचे संकेत दिले असताना आता गोवा राज्यातही लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
देशात दुसऱ्या लाटेत अनेक जिल्हे आणि राज्यांमध्ये करोनाचा धोका वाढल्यानंतर लॉकडाऊन लागू करण्याचे सत्र सुरू आहे.
महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये लॉकडाऊन नियम पुन्हा लागू करण्यात आल्यानंतर आता शेजारचे राज्य गोवा येथे पुन्हा एकदा ‘जनता कर्फ्यू’ वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एकेकाळी करोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गोव्यात पुन्हा करोनाचा धोका वाढल्याने ‘जनता कर्फ्यू’ पाळण्यात येणार असल्याचे खुद्द गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. गोवा सरकारने 7 जून 2021 रोजी सकाळी 7 पर्यंत कर्फ्यू वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सावंत यांनीच याबाबत ट्विट केले आहे.