देशभर पुकारलेल्या लॉकडाऊनने मजुरांची जिंदगीच लॉकडाऊन’

संगमनेर   -करोना नावाच्या महामारीने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. त्यामुळे जगभरात करोडो लोकांचा रोजगार गेला आहे. अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य सर्व छोटे-मोठे उद्योग, बांधकाम, विकासकामे सर्वकाही ठप्प झाले आहे. त्यातून मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. स्थानिक मजुरांनी यापूर्वीच आपली गावं जवळ करून जगण्याचा मार्ग निवडला आहे.

मात्र परप्रांतातून पोट भरण्यासाठी आलेल्या मजुरांचे मात्र मोठे हाल होत आहे. संगमनेरातील एका ठेकेदाराकडे काम करणाऱ्या मजुरांचे काम बंद झाल्याने त्यांनी पायी आपल्या घरी जाण्याचे ठरविले. साहेब जगण्याला पैसा लागतो, कोरोनामुळे मेलं तरी चालेल परंतु उपासमारीमुळे मरण आम्हाला पसंद नाही. असे म्हणत त्यांनी शेकडो किलोमीटर पायी जाण्याचा निर्णय घेतला.

कोणतेही वाहन मिळत नसल्याने अनेक मजूर पायपीट करत आपल्या गावी परतू लागले आहेत. मध्यप्रदेशातील दोन कुटुंब संगमनेरमध्ये रोजंदारी करीत होते. संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्याने त्यांचे कामही बंद झाले. हाताला काम नाही तर जगणार कसे, इथे रहायला सहारा नाही म्हणून त्यांनी आपल्या गावी जाणे पसंद केले. आपला सगळा संसार डोक्‍यावर घेऊन ते पायी निघाले.

रेल्वेसेवा बंद पडली आहे. बस सेवाही नाही, वाटेत खाजगी वाहन मिळेल या आशेने त्यांनी पायी प्रवास सुरू केला. देशभर पुकारलेल्या लॉकडाऊनने मजुरांची जिंदगीच लॉकडाऊन झाली आहे. एकूणच निवडणुकीच्या काळात स्थानिक प्रश्‍नावर आक्रमक असलेले पुढारीदेखील या जीवघेण्या समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.