समर्थ पोलिसांनी अवघ्या तासाभरात घेतले ताब्यात
पुणे(प्रतिनिधी) – लॉकडाऊनमुळे पैसे कमावण्यात अपयशी ठरल्यामुळे एका रिअल इस्टेट एजंटने सोनसाखळी चोरी केली. मात्र, समर्थ पोलिसांनी अवघ्या तासाभरात त्याला जेरबंद केले. त्याने एका ज्येष्ठ महिलेची 35 हजार रुपयांची सोनसाखळी चोरुन नेली होती.
मोहम्मद आतिफ इक्बाल शेख (वय 26) रा. नाना पेठ याला पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी संबंधित जेष्ठ महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, दुपारी दीडच्या सुमारास एका स्कूटरस्वाराने तिची चेन हिसकावून घेतली आणि तो पसार झाला. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, हवालदार साहिल शेख, संतोष काळे, निलेश साबळे, प्रमोद टिळेकर, सुमित कुट्टे आणि स्वप्नील वाघोले यांच्या पथकाने दागिन्यांच्या दुकानासमोरुन शेखला अटक केली.
यासंदर्भात माहिती देताना उपनिरीक्षक कापुरे म्हणाले, “सोनसाखळी हिसकावण्यासाठी संबंधिताने हिरव्या रंगाची स्कूटर वापरल्याची माहिती या महिलेने दिली होती. यामुळे आम्ही त्या परिसरातील स्कूटर्स आणि दागिन्यांच्या दुकानांत तपासणी करण्याचे ठरविले. त्याचवेळी परिसरातील फोन कॉल्सच्या तपशीलांचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. यामध्ये शेखचा नंबर शोधण्यात यश आले.
पोलिसांच्या पथकाला हिरव्या रंगाच्या स्कूटरचा चालक नाना पेठेत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर दागिन्यांच्या दोन दुकानांजवळ सापळा रचला. शेखला ताब्यात घेतल्यानंतर फिर्यादी महिलेला घटनास्थळी बोलावले. तिने तिची सोनसाखळी ओळखली.