नवी मुंबई – राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी लागू करून प्रशासन वेळोवेळी खबरदारी घेत आहे. तर नागरिकांना सतत घरात सुरक्षित राहण्याचे आवाहन करत आहे. अनावश्यक ठिकाणी गर्दी करणाऱ्यांना तर चांगलाच चोप देत आहेत. असे सर्व कडक नियम असताना देखील पनवेल मधील एका लोकप्रतिनिधीनेचं या सर्व नियमांचे उल्लंघन करून मित्रांना गोळा करून आपला वाढदिवस साजरा केला आहे. सध्या पोलिसांनी या लोकप्रतिनिधीवर कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वत:च्या घरी नगरसेवक अजय बहिरा यांनी बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते. ते राहत असलेल्या इमारतीच्या गच्चीवर मित्रांसोबत सेलिब्रेशन करत होते. पण या ठिकाणी पोलिसांनी अचानक धाड टाकली असता तिथे 11 जण उपस्थित होते. त्यांनी यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नव्हते. तसंच जमावबंदी असताना एकत्र येणे, मास्क न घालणे इत्यादी गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आले आहेत.
पनवेलमधील प्रभाग क्रमांक 20 चे अजय बहिरा हे भाजप नगरसेवक आहेत. अजय बहिरा यांचा 10 एप्रिल रोजी वाढदिवस होता. लॉकडाऊन असल्याने त्यांनी घरीच बर्थडे पार्टीचे आयोजन केले आणि मित्रांनाही आमंत्रित केले. परंतु राज्यात संचारबदी असल्याने चारपेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास मज्जाव आहे.
तरीही अजय बहिरा यांच्यासह 11 जण इमारतीच्या गच्चीवर पार्टी करत होते. संचारबंदीचे नियम यावेळी पायदळी तुडवण्यात आलेच, पण सोशल डिस्टन्सिंगलाही या नगरसेवकांकडून हरताळ फासला गेला. शिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे अनिवार्य असताना, कोणीही याचे पालन न केल्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकून नगरसेवकासह अकरा जणांवर गुन्हा दाखल केला.