नवी दिल्ली – जगभरासह देशात करोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये दुकाने, उद्योग सर्व बंद आहेत. त्यामुळे अनेक छोट्या-मोठ्या उद्योजकांना तोटा होत आहे. पण या लॉकडाऊन दरम्यान जगभरातील असे काही उद्योजक आहेत. त्यांना उद्योगामध्ये मोठा फायदा होत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये अमेझॉनचे संस्थापक जेफ बझोस, झूप ऍपचे मालक ऍरिक युआन आणि टेस्लाचे प्रमुख ऍलन मस्क यांचा समावेश आहे. या तीन उद्योजकांना लॉकडाऊनमध्ये तब्बल अरब डॉलरचा फायदा झाला आहे.
जगभरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस यांच्या संपत्तीमध्ये लॉकडाऊनच्या काळात मोठी वाढ झाली आहे. अमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस यांच्या उत्पन्नामध्ये 1 जानेवारी ते 20 एप्रिलपर्यंत जवळपास एक अरब डॉलरची वाढ झाली आहे. लॉकडाऊनमध्ये दुकाने बंद असल्यामुळे अनेकजण ऑनलाईन शॉपिंग करत आहेत.
तसेच झूम ऍपचे मालक ऍरिक युआन यांच्या संपत्तीमध्ये लॉकडाऊन दरम्यान मोठी वाढ झाली आहे. गेल्या तीन महिन्यात युआन यांच्या उत्पन्नात एक अरब डॉलरची वाढ झाली आहे. झूम ऍपच्या माध्यमातून एकाचवेळी 100 लोक व्हीडिओ कॉन्फरन्स करु शकतात आणि लॉकडाऊनमध्ये या ऍपचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे.
करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक देशांना व्हेंटिलेटरची गरज पडत आहे. अशावेळी फोर्ड मोटर्स, जनरल इलेक्ट्रॉनिक्स आणि टेस्लासारख्या कंपन्या व्हेंटिलेटर तयार करुन रुग्णालयाला देत आहेत. त्यामुळे 1 जानेवारी ते 20 एप्रिलपर्यंत टेस्लाचे प्रमुख ऍलन मस्क यांच्या उत्पन्नात एक अरब डॉलरची वाढ झाली आहे.