जळोची – बारामतीमध्ये करोनाच्या संख्येत वाढ होत आहे. एकाच दिवसात 18 जणांना लागण झाली आहे. रुग्ण वाढण्यापूर्वी पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष ऍड. सुधीर पाटसकर यानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली आहे.
आता लॉकडाऊन उठवल्याने शहरातील जवळपास सर्व व्यवहार पूर्ववत झाले आहेत. त्यात पुन्हा करोनाचा शिरकाव झाला आहे. तर सगळ्यांकडून नियम पायदळी तुडवले जात आहे, त्यामुळे करोनाचा आणखी धोका वाढला आहे. तर लॉकडाऊन केल्यास संक्रमणाची साखळी तुटेल.
तसेच बारामतीतील खासगी हॉस्पिटलमध्ये काही ठराविक बेड करोनासाठी राखीव ठेवावे, ते प्रशासनाने ताब्यात घ्यावेत, यासाठी प्रशासनाला आदेश द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.