लॉकडाऊनचा साखर निर्यातीवर परिणाम

देशातून होणाऱ्या विक्रीतही झाली घट
मुंबई : गेल्या वर्षी देशात साखरेचे अतिरिक्त उत्पादन झाल्यामुळे साखर निर्यात वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र लॉक डाऊनमुळे या निर्यातीवर परिणाम झाला असल्याचे इस्मा या साखर उत्पादकांच्या संघटनेने म्हटले आहे. लॉक डाऊनमुळे केवळ निर्यातीवर परिणाम झालेला नाही तर देशांतर्गत साखर विक्रीवरही परिणाम झाला आहे.

मात्र विविध देशाकडून पुरेशा ऑर्डर येत असल्यामुळे लॉक डाऊन संपुष्टात आल्यानंतर ही तूट भरून काढली जाऊ शकते असे इस्माने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. दरम्यान गेल्या वर्षी 15 एप्रिलपर्यंत 31.17 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन झाले होते मात्र लॉक डाऊन आणि इतर कारणामुळे यावर्षी 15 एप्रिल पर्यंत या उत्पादनात 20 टक्के घट होऊन हे उत्पादन 24.78 दशलक्ष टन एवढे झाले आहे.

या संस्थेने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की जागतिक बाजारात साखरेच्या किंमती घसरल्या आहेत. मात्र दरम्यानच्या काळामध्ये भारतीय रुपयाचे मोठ्या प्रमाणात अवमूल्यन झाल्यामुळे निर्यातदारांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

इंडोनेशियाकडून भारताला साखरेची मोठ्या प्रमाणात मागणी येण्याची शक्‍यता आहे. कारण इंडोनेशियाला साखर पुरवठा करणाऱ्या थायलंडमधील साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे भारताला इंडोनेशियाकडून बऱ्याच ऑर्डर येत आहेत. त्याचा फायदा भारतातील साखर निर्यातदार घेतील असे या पत्रकात म्हटले आहे. या वर्षी केंद्र सरकारने साखर उत्पादकांना 60 लाख टन साखर निर्यात करण्यास परवानगी दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.