अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठी सवलत
उद्यापासून काही अंशी शिथिलता मिळणार
महापालिका आयुक्तांनी काढले सुधारित आदेश
पुणे –“गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला लॉकडाऊन रविवारी शिथिल होणार असून, त्या दिवशी नागरिकांना जीवनावश्यक वस्तू म्हणजे किराणा, भाजीपाला, मटण, चिकन, अंडी, मासे खरेदीचा आनंद घेता येणार आहे. ही शिथिलता असली, तरी नागरिकांनी गर्दी करू नये. केवळ जीवनावश्यक वस्तू घ्यायच्या असतील तरच बाहेर पडावे; बाहेर पडल्यास सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच खरेदीला मुभा असेल.
शहरातील करोनाची साखळी तोडण्यासाठी दहा दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा पालकमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या आयुक्तांनी लॉकडाऊनमध्ये काय सुरू राहणार, काय बंद राहणार याचे सविस्तर आदेश काढले होते. पहिले पाच दिवस कडक आणि नंतरचे पाच दिवस सौम्य लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यातील पहिल्या पाच दिवसांची मुदत रविवारी मध्यरात्री संपली. त्यामुळे रविवारपासून बाजारपेठ काही अंशी सुरू होणार आहे. रविवारपासून केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्याला परवानगी देण्यात आली आहे. रविवारी दहा तास दुकाने उघडी ठेवण्याचे आदेश असले, तरी सोमवारपासून 23 जुलैपर्यंत सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेतच दुकाने उघडी ठेवण्याला परवानगी आहे.
उद्यापासून ठरलेल्या वेळेत व्यवहार
मटण, चिकन, अंडी, मासे इत्यादी विक्री व्यवसाय करणारे व्यापारी दुकाने रविवारी पूर्ण दिवस उघडी ठेवण्याला परवानगी देण्यात आली आहे. सोमवारपासून ही दुकाने सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत सुरू राहतील. मंडई, भाजी विक्रेते, फळ विक्रेते यांनाही सकाळी 8 ते 12 अशी परवानगी राहणार आहे.
फक्त यालाच परवानगी
ई-कॉमर्सला या लॉकडाऊनमध्ये परवानगी आहे. यात ऍमेझॉन, फ्लिपकार्ट पोर्टल्सच्या माध्यमातून नागरिकांना वस्तू घरपोच मिळणार आहेत. पण, झोमॅटो-स्विगी आणि तत्सम पोर्टल सेवा बंद राहणार आहे.
शिथिलतेच्या वेळा
फक्त रविवारी – सकाळी 8 ते सायंकाळी 6
सोमवारपासून पुढील चार दिवस – सकाळी 8 ते 12
काय बंद राहणार –
हॉटेल्स पार्सल सुविधेसह, बार, लॉज, रिसॉर्ट, मॉल, वाईन शॉप, केशकर्तनालय, ब्युटी पार्लर, स्पा, शहरातील सार्वजनिक आणि खासगी वाहतूक