पुनर्विकासासाठी दोनशे कोटींचा खर्च
25 एकर जागेत उभे राहणार क्रीडासंकुल : अत्याधुनिक सोयी-सुविधा देणार
पिंपरी – नेहरुनगर येथील कै.अण्णासाहेब मगर स्टेडियमची इमारत जीर्ण झाल्याने ती पाडण्यात येणार आहे. त्या ठिकाणी मैदान व इमारतीचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. यासाठी 200 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून अत्याधुनिक सोयी-सुविधांयुक्त मैदानाचा विकास केला जाणार आहे.
नव्या स्टेडियममध्ये विविध खेळांसाठी सुविधा उपलब्ध करुन देता येणार आहे. विशेषतः मैदानी खेळांसाठी चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नव्या मगर स्टेडियममध्ये क्रिकेटचे मैदान, क्लायम्बिग वॉल, ऍथलेटिक्सचा सिंथेटिक ट्रॅक, होस्टेल, टेनिस कोर्ट, बास्केट बॉल आदी सुविधा पुरविण्यात येणार आहे. या अद्यावत क्रीडासंकुलाच्या प्रकल्पाचे महापालिकेचे पदाधिकारी, गटनेते व अधिकाऱ्यांसमोर सल्लागारांने सादरीकरण केले. या वेळी महापौर माई ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर व अधिकारी उपस्थित होते.
जुने स्टेडियम पाडण्यास स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली. त्याठिकाणी 25 एकर जागेत अद्यावत क्रीडासंकुल तयार करण्यात येणार आहे. नव्या क्रीडासंकुलामध्ये प्रत्येक खेळाची स्वतंत्रे मैदाने असणार आहेत. त्यामध्ये खो-खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट, टेनिस यांचा समावेश असणार आहे. त्याचप्रमाणे ऍथलेटिक्सचा 400 मीटरचा सिथेंटिक ट्रॅक बांधण्यात येणार आहे. तिथेच भव्य कार्यालय बांधण्यात येणार आहे. सद्यस्थितीत मैदानामध्ये जलतरण तलाव आहे. त्याचा पुनर्विकास केला जाणार आहे. पाणी शुद्धीकरणासाठी नवे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे.
मैदान परिसरामध्ये कल्ब हाऊस तयार करण्यात येणार आहे. खेळाडू व प्रेक्षकांसाठी वाहनतळाची सोय करण्यात येणार आहे. तसेच, जुना क्लायम्बिग वॉल पाडून नव्या नियमानुसार क्लायबिंग वॉल उभारले जाणार आहे. दोन वर्षांमध्ये प्रकल्प पूूर्ण करण्यात येणार आहे.