पुणे-नीरापूल प्रलंबित कामांना स्थानिकच जबाबदार

– श्रीनिवास वारुंजीकर

पुणे – पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचा दर्जा आणि टोलवसुली याबाबत गेले काही दिवस सर्वच माध्यमे आणि समाजमाध्यमांतून टिकेची झोड उठवली जात असताना, या महामार्गाची पालक कंपनी असलेल्या, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आपली बाजू मांडताना म्हटले आहे की, या रस्त्यावरील, विशेषत: खेड-शिवापूर ते सारोळा येथील नीरा पूलापर्यंतच्या प्रलंबित कामांना स्थानिक नागरिकांचा विरोध आणि राजकीय हस्तक्षेप जबाबदार आहे. त्यामुळे आता टोलमुक्तीचा नारा आणि प्रलंबित कामांमुळे बिघडलेला रस्त्याचा दर्जा याबाबत “टोलवाटोलवी’ सुरु झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पुण्यातले कार्यालय वारजे येथे असून या कार्यालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 (जुना क्र. 4) वरील विविध समस्या, रस्त्याचा दर्जा, प्रलंबित कामे याविषयी दै. प्रभातने दि. 25 रोजी एक 20 प्रश्‍नांची प्रश्‍नावली महामार्ग प्राधिकरणाला सादर केली होती. तसेच सातारा येथील काही समाजमाध्यम गटांनी आ. शिवेंद्रसिंह भोसले आणि माजी खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या नेतेपदात महामार्ग प्राधिकरणाला टोलबंदीविषयी 1 डिसेंबरचा अल्टीमेटम दिला आहे.

दै. प्रभातने दिलेल्या प्रश्‍नावलीनुसार दि. 26 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत, देहुरोड ते शेंद्रे-सातारा या 140 किमीच्या अंतरात प्रत्यक्ष साईट व्हिजिट करुन माहिती घेण्यात आली. यावेळी इंडिपेंडंट इंजिनिअर्सचे टीम लिडर गिरिशचंद्र झा यांच्या मार्गदर्शनाखाली असिस्टंट हायवे इंजिनिअर देवेश चतुर्वेदी, सिनियर क्वालिटी मटेरिअल एक्‍सपर्ट अशोक वरवट्टीकर आणि सर्व्हे इंजिनिअर प्रसाद पी. यांच्यासमवेत ही साईट व्हिजिट करण्यात आली. त्यामधून समोर आलेले वास्तव हे भीषण असून, स्थानिक नागरिकांचा विरोध आणि राजकीय हस्तक्षेपामुळेच खेड-शिवापूर ते नीरा पूलदरम्यानची उड्डाण पूलांची कामे प्रलंबित राहिली आहेत, असे सकृतदर्शनी दिसून येत आहे.

अनेकदा महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करताना, सरकारने नुकसान भरपाई दिलेली असूनही अनेकांनी जादा नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तसेच महामार्गापासून विविध गावांकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभारलेले अथवा प्रस्तावित असलेले उड्डाणपूल निर्धारित जागेपेक्षा अन्यत्र उभे करण्यासाठी नागरिकांनी आंदोलने केल्याचे दिसून येते. काही ठिकाणी मंदिर, दर्गा हटवण्यात अडथळे आल्याने तर काही ठिकाणी “पादचारी पूल हवा’, “पादचारी अंडरपास हवा’ अशा मागण्या पुढे रेटण्यात आल्या आहेत. या अशा सततच्या मागण्यांमुळे महामार्ग प्रशासन आणि विकसक कंपनी यांना सातत्याने बदल करणे, असे बदल दिल्ली कार्यालयाकडून मंजूर करुन घेणे आणि मग त्याची अंमलबजावणी करणे, यामुळे कामे संपण्यात विलंब लागत गेला आहे.

अशातच खेड-शिवापूर ते नीरा पूलापर्यंत चार उड्डाणपूलांची कामे प्रलंबित असल्याने सर्व वाहतून सध्या पुणे-सातारा मार्गिकेमध्ये चार बाह्यवळणांवरुन (डायव्हर्जन) सुरु आहे. अर्थातच हा सेवा रस्ता आहे. यावर्षी झालेल्या अतिप्रचंड पावसाने या सेवा रस्त्यावर खड्डे पडले आहेत, हे वास्तव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सातारा येथील जाहीर सभेवेळी आणि आणखी दोन वेळा या डायव्हर्जवरील खड्डे बुजवण्यात आले होते. मात्र, अतिप्रचंड पावसाने पाणी साठल्याने हे डांबर वाहून गेले, असे दिसून आले आहे. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांत रस्त्यांची प्रलंबित कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना टोलबंदीची मागणी अवास्तव असल्याचे महामार्ग प्राधिकरणाचे मत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.