पिंपरी – अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता पुणे ते लोणावळा व लोणावळा ते पुणे सकाळी आणि सायंकाळी दोन फेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत. या लोकलने सामान्य नागरिकांना प्रवास करता येणार नसून फक्त अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना प्रवास करता येणार आहे. यासाठी रविवारी शहरातील रेल्वे स्थानकांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.
राज्य सरकारच्या सुचनेनुसार ह्या लोकल फेऱ्या सुरु करण्यात आल्या असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे नोडल ऑफिसर म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
यानुसार त्यांनी नेमलेल्या कर्मचाऱ्यांमार्फत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना क्यू आर कोडवर आधारित ओळखपत्र दिली जाणार आहेत. या लोकलमधून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीच प्रवास करु शकणार असून ओळखपत्र आणि तिकीट, पास आवश्यक असणार आहे.
पुणे ते लोणावळा साठी सकाळी 8:5 मिनिटाने सुटणार आहे. तर, सायंकाळी 6 वाजून दोन मिनिटांची लोकल असणार आहे. तसेच लोणावळ्यावरुन पुणेसाठी सकाळी 8 वाजून 20 मिनिटांनी व सायंकाळी 5:30 वाजता लोकल असणार आहे. ह्या लोकल गाड्या पुणे ते लोणावळा दरम्यान सर्व रेल्वे स्थानकांवर थांबणार आहेत.