भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. राजीवन यांची माहिती
पुणे – आगामी काळात अरबी समुद्रातील चक्रीवादळांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन स्थानिक पातळीवरील हवामानाचे अंदाज आगामी काळात देण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रशासनाला वेळेत योग्य ती पावले उचलता येतील, अशी माहिती भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. राजीवन यांनी बुधवारी व्यक्त केली.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेओरोलॉजी (आयआयटीएम) येथे हवामान बदल; तसेच अतिवृष्टी आणि चक्रीवादळांच्या अंदाजांवर आधारित आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. डॉ. राजीवन म्हणाले, “यावर्षी अरबी समुद्रात सरासरीपेक्षा जास्त संख्येने चक्रीवादळांची निर्मिती झाली. त्यांची तीव्रताही अपेक्षेपेक्षा जास्त होती. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून अरबी समुद्रातील चक्रीवादळांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार अरबी समुद्रात दर 30 वर्षांनी चक्रीवादळांची संख्या वाढते आणि कमी होते असे दिसून येते. या चक्रानुसार सध्या जास्त चक्रीवादळांचा कालावधी सुरू झाला असून आगामी तीन दशकांत अरबी समुद्रात सरासरीपेक्षा जास्त चक्रीवादळे तयार होण्याच्या घटनांमध्ये वाढ होणे अपेक्षित आहे.’
30 नोव्हेंबरपर्यंत होणाऱ्या या कार्यशाळेला नासा, ऑक्सफर्ड, एमआयटी, नोआ, टोकियो विद्यापीठ आदी प्रख्यात संस्थांमधील शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत. चक्रीवादळांचा मार्ग आणि तीव्रता, चक्रीवादळे धडकण्याची ठिकाणे आणि त्याचे संभावित परिणाम, अतिवृष्टीच्या घटनांचा अंदाज देण्यासाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर आदी विषयांवर या कार्यशाळेत चर्चा आणि मार्गदर्शन होणार आहे.