पुणे ते लोणावळा आणि पुणे ते दौंड लोकल सेवेला अत्यल्प प्रतिसाद

पुणे ते लोणावळा मार्गावर केवळ 450 तर, पुणे-दौंड मार्गावर दररोज केवळ 250 नागरिकांकडून प्रवास

 

पुणे – राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवल्यानंतर पुणे ते लोणावळा आणि पुणे ते दौंड या मार्गावर अत्यावश्‍यक सेवेतील नागरिकांसाठी लोकल सेवा सुरू केली. मात्र, या सेवेला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे.

लॉकडाऊनमध्ये रेल्वेची प्रवासी सेवा स्थगित झाली. या कालावधीत रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येत होत्या. लॉकडाऊनचे बहुतांश नियम शिथिल झाल्यानंतर पुणे विभागातील लोणावळा लोकल सुरू करण्यासाठी परवानगी दिली. तर, जानेवारीपासून दौंडसाठी शटल सेवा सुरू केली. मात्र, या गाड्यांमध्ये शासकीय कार्यालयांसह ठराविक अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यास परवानगी आहे.

नागरिकांना पोलिसांकडून ई-पासेस देण्यात येत आहेत. पासधारक प्रवाशांनाच तिकीट मिळते. 12 ऑक्‍टोबरपासून पुणे-लोणावळा या मार्गावर उपनगरीय सेवा (लोकल) सुरू झाली असून, पुणे-लोणावळा-पुणे मार्गावर सुमारे आठ गाड्या धावतात. तर, 26 जानेवारीपासून पुणे ते दौंड या मार्गावर शटल सेवा सुरू केली असून, पुणे-दौंड-पुणे मार्गावर एकूण चार गाड्या धावतात. या सेवेला प्रवाशांकडून तुलनेने कमी प्रतिसाद आहे. प्रवाशांची संख्या कमी असल्याने जवळपास निम्मी गाडी रिकामीच धावत आहे.

सध्या पुणे ते लोणावळा या मार्गावरील लोकलमधून केवळ सुमारे 450 नागरिक प्रवास करत आहेत. पुणे-दौंड या मार्गावर दररोज केवळ सुमारे 250 नागरिक प्रवास करतात असल्याचे पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.