टाकाऊ वस्तूंपासून निर्माण केली टिकाऊ धान्य वितरण यंत्रणा
इगतपुरी तालुक्यातील मानवेढेच्या महिला रेशन दुकानदाराचा अभिनव उपक्रम
नाशिक : राज्यातील मेट्रो शहरांत लॉकडाऊनमध्ये अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडविले जात असल्याचे प्रकार सर्रास घडत आहे. मात्र, अशाही परिस्थितीत मानवेढे या पुनर्वसित अतिदुर्गम गावातील स्वस्त धान्य दुकानदार महिलेने स्वयंप्रेरणेने “सोशल डिस्टन्स’ राखण्यासाठी अभिनव उपक्रम राबविला आहे.
इगतपुरी तालुक्यातील मानवेढे या गावातील महिला रेशन दुकानदार पौर्णिमा भागडे यांनी ही अनोखी शक्कल लढवून करोना विरोधातील लढा सुरू ठेवला आहे. त्यांनी घरातील टाकाऊ पाईप आणि भोंगा एकमेकाला जोडून ग्राहकांना योग्य पद्वतीने शांततेत धान्य वितरण करण्यात येत आहे.
पौर्णिमा भागडे यांच्या अनोख्या प्रयोगामुळे शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे उत्स्फूर्तपणे पालन होत असून, एक स्तुत्य उपक्रम असल्याचे इगतपुरीच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांनी सांगितले. गावातील या प्रयोगामुळे करोनाला चांगल्या पद्धतीने प्रतिबंध करता येऊ शकणार आहे. या प्रयोगाची अंमलबजावणी सर्व स्वस्त धान्य दुकानांमध्ये राबविण्यासाठी प्रभावी नियोजन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तसेच टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ असणारी धान्य वितरण करणारी यंत्रणा तयार करून सोशल डिस्टन्सिंगला या महिला दुकानदाराने एकप्रकारे बळ दिले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.