प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी लोकल, “डेमू’मध्ये सीसीटीव्ही

विष्णु सानप
18 स्थानकांवरही बसविले जाणार सीसीटीव्ही कॅमेरे; ऑगस्टमध्ये होणार कार्यान्वित

पिंपरी – मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील उपनगरी रेल्वेमध्ये व स्थानकावर येत्या ऑगस्ट महिन्यापासून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. पुणे विभागातील रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी निर्भया निधीअंतर्गत 539 सीसीटीव्ही बसवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

पुणे विभागात धावणाऱ्या दौंड-बारामती डेमू व पुणे-लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये रेल्वे प्रवाशांच्या व महिलांच्या सुरक्षेसाठी हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यामुळे लोकल व डेमू रेल्वेगाड्यात टवाळखोरांवर नियत्रंण मिळविण्यास मदत होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून रेल्वे गाड्यात एकटी महिला किंवा प्रवासी बघून चोरीचे प्रकार उघडकीस येत आहेत. तर, महिलांसोबत गैरवर्तन करण्यात आल्याच्या तक्रारीही समोर आल्या होत्या. या बाबींची गंभीर दखल घेत रेल्वे प्रशासनाने कॅमेरे बसविण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे.

यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर दोन कर्मचाऱ्यांची खास सीसीटीव्हीच्या देखरेखीसाठी नेमणूक करण्यात येणार आहे. यामुळे रेल्वेत होणारी हुल्लडबाजीला चाप बसणार असून रेल्वे प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येणार असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. पुणे ते लोणावळा दरम्यान 44 लोकल धावतात तर दौंड-बारामती दरम्यान 3 डेमूच्या 7 फेऱ्या होतात. यासाठी प्रत्येक डब्यात दोन सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. तसेच पुणे विभागातील 18 रेल्वे स्थानकांवर मिळून 539 कॅमेरे बसवण्यात येणार आहेज. याशिवाय संवेदनशील ठिकाणीही कॅमेरे बसविण्याची रेल्वे प्रशासनाची तयारी आहे.

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा प्रशासनाला महत्त्वाची असून यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो. रेल्वे डब्यात होणाऱ्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निर्भया निधी बरोबरच अन्य फंडातूनही कॅमेरे खरेदी करण्यात येणार आहेत. सीसीटीव्ही ऑगस्ट महिन्याच्या आधीच बसवण्यास सुरुवात करण्याचा आमचा मानस आहे.

– संजय कुमार, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.