रेल्वे प्रवासादरम्यान मिळणार स्थानिक खाद्यपदार्थ

“आयआरसीटीसी’कडून रेल्वे प्रवाशांसाठी नवी सुविधा

– कल्याणी फडके

पुणे – रेल्वे प्रवास करताना चांगल्या दर्जाचे खाद्यपदार्थ मिळावेत, ही प्रत्येक प्रवाशाची माफक अपेक्षा असते. यासह प्रवाशांच्या वेळ आणि आवडीनुसार खाद्यपदार्थ मिळाल्यामुळे त्यांचा प्रवास चांगल्या रितीने अनुभवता येतो. या खानपान सुविधेमध्ये आता स्थानिक अर्थात प्रादेशिक “खासियत’ असणाऱ्या पदार्थांची भर पडणार आहे.

अनेकदा प्रवासात असताना वेळ आणि आवडीनुसार खाद्यपदार्थ मिळत नाहीत. मात्र, इंडियन रेल्वे केटरींग ऍन्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)च्या सेवेमुळे आता हे शक्‍य झाले आहे. “ई-केटरिंग’च्या माध्यमातून प्रवासी हवे तेव्हा आणि हवे ते खाद्यपदार्थ “ऑर्डर’ करू शकतात. पूर्वी “आयआरसीटीसी’ किंवा “रेल्वे बोर्डाने’ ठरवून दिलेले पदार्थ मागवता येत होते. मात्र, आता यामध्ये स्थानिक पदार्थांची भर पडणार आहे. प्रवास करताना संबंधित प्रदेशातील स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याला अधिकाधिक प्रवासी पसंती देतात. त्यामुळे “आयआरसीटीसी’च्या अधिकाऱ्यांकडून आता शहरांची “खासियत’ असणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना संपर्क करण्यात येत आहे. यासह प्रवाशांना स्थानिक फळांचा देखील आस्वाद घेता येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

प्रवाशांनी “ऑर्डर’ केलेले खाद्यपदार्थांची किंमत 200 रुपयांपेक्षा कमी असल्यास प्रवाशांना “ऑर्डर’ मिळाल्यानंतर पैसे देता येणार आहेत. “ई-केटरिंग’ योजनेमध्ये “सबवे’, “डॉमिनोज’, “हल्दीराम’, “बिर्याणी ब्लू’, “रेल रेस्टो’, “रेलफूड’, “झूप’ आदी खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे.

असे करता येणार खाद्यपदार्थ बुक
“आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावर स्थानकाची निवड केल्यानंतर संबंधित विक्रेत्यांची यादी प्रवाशांना मिळणार आहे. हॉटेलचा पर्याय निवडल्यानंतर मेनू कार्डमधील खाद्यपदार्थ “ऑर्डर’ करता येणार आहे. मात्र, ही ऑर्डर दोन तास आधी करावी लागणार आहे.

लवकरच स्टार्टअपला संधी
“आयआरसीटीसी’च्या खानपान सुविधेमध्ये लवकरच “स्टार्टअप’चा समावेश करण्यात येणार आहे. खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्या स्टार्टअप कंपन्यांना आता रेल्वेमध्ये खाद्यपदार्थांची “अधिकृत’पणे विक्री करता येणार आहे. “स्टार्टअप’अप कंपन्यांना वाव मिळावा, यासाठी त्यांचा समावेश येत्या काळात केला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

प्रत्येकाला स्वत:च्या सोयीनुसार आणि आवडीनुसार खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी “ई-केटरिंग’ची सेवा प्रवाशांना देण्यात येते. अधिकृत विक्रेत्यांच्या माध्यमातून अधिकाधिक चांगल्या दर्जाचे खाद्यपदार्थ प्रवाशांना मिळावेत, असा आमचा मानस आहे. रोज सुमारे 10 हजार प्रवासी या सेवेचा लाभ घेत आहेत.
– गुरूनाथ सोना, सहायक व्यवस्थापक, “आयआरसीटीसी’

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here