पुण्यासाठी बड्या अधिकाऱ्यांचा हट्ट : वर्णी कोणाची लागणार, याबाबत उत्सुकता
– डॉ.राजू गुरव
पुणे – विविध कार्यालयातील शिक्षण उपसंचालकांची पदे पदोन्नतीने भरण्यात येणार आहेत. यासाठी बड्या अधिकाऱ्यांची यादीही निश्चित झाली आहे. बऱ्याचशा अधिकाऱ्यांना पुणे विभागात पदोन्नती हवी असून त्यासाठी त्यांनी शासनाकडे हट्टही धरला आहे. येत्या एक-दोन दिवसांत याबाबतचे आदेश जारी होण्याची शक्यता आहे.
राज्यात शिक्षण उपसंचालकांच्या एकूण 36 पैकी फक्त 9 पदे भरण्यात आली असून, उर्वरित 27 पदे अनेक वर्षांपासून रिक्तच आहेत. गेल्या एक-दोन वर्षांपासून अधिकारी पदोन्नतीची वाट पाहत आहेत. यात औदुंबर उकिरडे, सुधाकर तेलंग, सुभाष बोरसे, हारुण आत्तार, मुस्ताक शेख, राजेश क्षीरसागर, अर्चना कुलकर्णी, संदीप संगवे, राजेंद्र अहिरे, वैशाली जामदार, श्रीराम पानझाडे, शैलजा दराडे, अनिल सावळे, रमाकांत काटमोरे, डॉ. गणपत मोरे, शिवलिंग पटवे आदी 16 अधिकाऱ्यांचा पदोन्नतीच्या निवडसूचीत समावेश आहे.
या अधिकाऱ्यांकडून महसूल विभागाची पसंती नोंदवून घेण्यात आली. त्याबाबतची बंधपत्रे शिक्षण आयुक्त कार्यालयामार्फत राज्य शासनाकडे पाठवण्यात आली आहेत. शिक्षण आयुक्त, प्राथमिक शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक, पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालय, पुणे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ या ठिकाणी प्रामुख्याने शिक्षण उपसंचालकांची पदे रिक्त आहेत. पदोन्नतीच्या यादीत आणखी दोन अधिकाऱ्यांची ऐनवेळीस नव्याने नावे समाविष्ट केल्याची चर्चा आहे. यामुळे सामान्य प्रशासन विभागाकडून पुन्हा सर्व यादीला मान्यता घेण्याची गरज भासली आहे. त्यामुळे पदोन्नतीचा तिढा सोडविण्यास विलंब लागत आहे हे स्पष्ट आहे.
कोण बाजी मारणार?
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक पदावर आपली वर्णी लागावी, यासाठी अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ आहे. प्रामुख्याने हारुण आत्तार, औदुंबर उकिरडे, अर्चना कुलकर्णी, डॉ. गणपत मोरे, राजेश क्षीरसागर यांच्यापैकीच एकाची या पदावर पदोन्नती होण्याची शक्यता आहे. राजकीयसह इतर वजन वापरण्यात अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा लागलेली आहे. त्यामुळे कोण बाजी मारून वरचढ ठरणार, याबाबत शिक्षण विभागात उत्सुकता आहे.