थेऊर – थेऊर येथे बॅंक ऑफ महाराष्ट्र पुणे पुर्व अंचल कार्यालयाअंतर्गत 5 शाखामार्फत बचत गटांसाठी कर्ज वितरण व आर्थिक साक्षरता शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरामध्ये 40 बचत गटांना 76 लाख 51 हजार रू. कर्ज मंजूर करण्यात आले.
शिबीरात 350 महिलांनी सहभाग घेतला. बॅंक ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक ए.बी.विजयकुमार यांनी महिलांना बचत गटाचे पंचसूत्रीचे महत्त्व सांगितले. पुणे पूर्व अंचल व्यव्स्थापक विवेक धवन यांनी महिलांना बचत गटामार्फत महिलांनी स्वत: उद्योजक कसे बनता येईल याबाबत मार्गदर्शन केले.
आर्थिक साक्षरतेसंदर्भात जिल्हा वित्तीय साक्षरता आधिकारी अग्रणी बॅंक यांनी महिलांना लोकोपयोगी सामाजिक सुरक्षा योजना सुरक्षाविमा, जीवन विमा, अटल पेन्शन, कृषी योजना व विविध कर्ज योजनांची व वेळेवर कर्ज परतफेडीचे फायदे यावर माहिती दिली.
यावेळी थेऊर ग्रामपंचायत सरपंच संगिता धुमाळ, ग्रामीण महिला व बालक विकास मंडळ संस्थेचे सचिव संतोष गदादे, सलग्न पाच शाखांचे शाखाधिकारी उपस्थित होते. शिबीर यशस्वी होणे कामी संगिता काळभोर, मीना कुंभारकर, कमर खान, पूजा सिन्हा व रश्मी कोटेचा, उप अंचल व्यवस्थापक शानबाग उपस्थित होते.